नागपूर : गणेशोत्सवाला अवघे ४८ तास शिल्लक असताना पावसाचा जोर वाढला आहे. गणेशोत्सव ची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. कोकणचा गणेशोत्सव खास आहे. मात्र, कोकणच्या दिशेने जाणाऱ्यांना या मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी येत्या २४ तासात पावसाचा जोर वाढणार आहे. या २४ तासात मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात पाऊस झोडपणार आहे. आज सकाळीपासून मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासांमध्ये उत्तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून, काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील काही दुर्गम भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असेल असाही प्राथमिक अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात २६ ऑगस्टपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा नव्याने सक्रिय होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे मान्सूनचा प्रभाव कमी झाला असला तरीही या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२५ ऑगस्ट ते २९ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने जारी केली आहे. महाराष्ट्रात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात या कालावधीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, मुंबई आणि उपनगरांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. केंद्रीय हवामान खात्याने २५ ते २९ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांना मुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. जोरदार पावसासह वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यभरात बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आता परतीचा पाऊस कधी यावर चर्चा सुरू आहे.