कला शाखेला चांगले दिवस येणार

नागपूर : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या निकालामध्ये यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे याचा सरळ परिणाम हा प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. विशेष म्हणजे, विज्ञान शाखेमध्ये प्रवेशासाठी झुंबड उडणार असली तरी यंदा कला शाखेच्या निकालातही १७ टक्क्यांनी वाढ झाल्याने कधी नव्हे ते कला शाखेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे.  करोना प्रभाव काहीसा कमी झाल्याने निकाल जाहीर होताच काही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये भेट देत एकमेकांचे अभिनंदन केले.

निकालात नागपूर विभागात यंदा वाणिज्य शाखा अव्वल ठरली. यावेळी कला आणि एमसीव्हीसी शाखांच्या विद्यार्थ्यांची कामगिरीही सुधारली असून राज्यात कला शाखेत १७.२० टक्के आणि एमसीव्हीसी शाखेत १२.७३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यासह विभागात दरवर्षी विज्ञान शाखेचा बोलबाला असतो. मागील वर्षी बारावीच्या निकालात ९ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. त्याचा परिणाम शाखानिहाय निकालावरही पडला. परिणामी, विज्ञान आणि वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होऊनही अनेकांना प्रवेश मिळाला नव्हता. यंदा निकालात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालात कला शाखेमध्ये ९९.८३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. वाणिज्य शाखेत ९९.९१ तर विज्ञान शाखेत ९९.४५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखेतील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल कमी असल्याचे दिसून येते. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमातही विद्यार्थ्यांची संख्या कमी असते. याशिवाय बारावीच्या निकालातही त्याची टक्केवारी अधिक  दिसत नाही. मात्र, यावर्षी निकालात झालेली वाढीमुळे कला शाखेतील प्रवेशाची चुरस वाढणार आहे.