नागपूर : अंमली पदार्थाच्या  व्यवसायात भाजप नेते आणि या पक्षाशी संबंधित लोकांचा सहभाग उघड झाला असून या माध्यमातून युवापिढीला नशेखोरीकडे वळवण्याचा प्रयत्न यातून दिसून येत आहे, असा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आज  येथे पत्रकार परिषदेत केला. अंमली पदार्थाच्या  व्यापाराशी संबंध असलेल्या मनीष भानुशाली, के.पी. गोसावी, रवींद्र कदम आणि एनसीबीचे समीर वानखेडे यांचे रॅकेट या क्षेत्रात काम करीत असून यामागील सूत्राधार जनतेसमोर यावा यासाठी या सर्वाना अटक करावी आणि डीआरआय आणि गुन्हे शाखेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी लोंढे यांनी के ली. गुजरातमधील मुंद्रा अदानी पोर्टवर ३००० किलो अंमली पदार्थ साठा पकडला गेला. यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मुंबईत एमसीबीच्या मार्फत क्रूझ प्रकरण घडवून आणण्यात आले. मुंद्रा पोर्टवर जप्त के लेले  ड्रग्ज व मुंबईतील एनसीबीची धाड यात काही समान धागेदोरे आहेत. या प्रकरणाशी संबंधित के.पी. गोवासी, मनीष भानुशाली, सुनील पाटील यांच्याशी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा थेट संबंध आहे.  हे एक वर्तुळ आहे  तर निरज यादव हा मध्यप्रदेशचा भाजपचा कार्यकर्ता आहे, असे लोंढे म्हणाले. २१ सप्टेंबरला मुंद्रा पोर्टवर ड्रग्ज पकडले गेले. त्यानंतर २२ सप्टेंबरला के.पी. गोसावी व भानुशाली गुजरातमध्ये पोहचले व गुजरातचे मंत्री किरिटसिंह राणा यांना भेटले. मुंद्रा पोर्टवरील कारवाई , मुंबईतील क्रूझ प्रकरण व या प्रकरणात  झालेली ५० लाख रुपयांची देवाण-घेवाण याची वाच्यता  सॅम झिसोझा यांनी दिली आहे.