चंद्रपूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजप आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कॉग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर बिनविरोध निवडून आल्या. तर मतदारांची जुळवा जुळव करण्यात अपयश आल्याने कॉग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार व भाजपचे किशोर जोरगेवार या दोन आमदारव्दयांवर उमेदवारी मागे घेण्याची नामुष्मी ओढविली.
तर बँकेच्या संचालक पदासाठी कॉग्रेसचे माजी राज्यमंत्री वामनराव गड्डमवार यांच्या कन्या तथा बँकेच्या संचालिका नंदा अल्लुरवार यांनी अखेरच्या क्षणी भाजपात प्रवेश केला. दरम्यान बँकेत जवळपास १२ संचालक बिनविरोधी निवडून आले आहेत.
जिल्हा बँकेच्या २१ संचालकासाठी २०२५-२६ ते ३०- ३१ या पंचवार्षिक कालावधीसाठी ही निवडणूक होत आहे. आज नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महिला गटातून एकही महिला उमेदवार उमेदवारी मागे घेण्यास तयार नसल्याने चुरस निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या क्षणी भाजपचे चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडीया कॉग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मदतीला धावून आले. आमदार भांगडीया यांनी उमेदवारी मागे घेण्यास काही तासांचा अवधी शिल्लक असतांना अर्थपूर्ण जादूची कांडी फिरविताच बँकेच्या विद्यमान संचालिका प्रभा वासाडे, सुचित्रा ठाकरे, रूपाली शिंदे, समीता हांडेकर यांनी नामांकन मागे घेतले. त्याचा परिणाम खासदार धानोरकर बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला.
तर दुसऱ्या महिला संचालिका तथा माजी राज्यमंत्री वामनराव गड्डमवार यांचा भाजप प्रवेश करून त्यांचीही संचालक पदी अविरोध निवड झाली. विशेष म्हणजे या बैठकीत खासदार धानोरकर यांना एका महिला उमेदवाराने उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकला म्हणून चांगलेच खडे बोल सुनावले. तिकडे आमदार विजय वडेट्टीवार यांचे मतदार पर्यटनाला गेल्याने तसेच आमदार जोरगेवार यांना मतदारांची जुळवा जुळव करण्यात अपयश आल्याने दोन्ही आमदारव्दयांना अखेरच्या क्षणी उमेदवारी मागे घ्यावी लागली. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वाधिक फटका वडेट्टीवार यांना बसला.
त्यांच्या पॅनल मधील बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, नंदा अल्लूरवार तथा संजय डोंगरे यांच्यासह अनेक उमेदवार आमदार भांगडीया यांच्यासोबत भाजपात गेले. त्यामुळे वडेट्टीवारांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. दरम्यान आज अखरेच्या दिवशी मनोहर पाऊणकर, डॉ.विजय देवतळे, डॉ.सुरेश महाकुलकर यांच्यासह अनेकांनी उमेदवारी मागे घेतली आहे.
बारा संचालक अविरोध
बँकेत आतापर्यतं बारा संचालक अविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अ गटातून बँकेचे विद्यमान अध्यक्ष संतोष रावत, रवींद्र शिंदे, संदिप गड्डमवार, संजय डोंगरे, दामोदर मिसार, विलास मोगरकर, गणेश तर्वेकर, नागेश्वर ठेंगणे, महिला गटातून खासदार प्रतिभा धानोरकर व नंदा अल्लूरवार यांचा समावेश आहे. तर गोंडपिंपरी येथून अमर बोडलावार व उल्हास करपे यांचे तर सिंदेवाही येथून वडेट्टीवार यांची माघार व इतर उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याने या दोन ठिकाणी नव्याने प्रक्रिया होणार आहे.
बँकेच्या ओबिसी गटात रंगतदार लढत होणार आहे. येथे कॉग्रेस सेवादल अध्यक्ष सुर्यकांत खनके, श्यामकांत थेरे, सुरेंद्र अडबाले यांची उमेदवारी कायम असल्याने ही लढत अटीतटीची होईल, तर ब गट २ मध्ये रोहित बोम्मावार, ॲड. वासुदेव खेळकर व उमाकांत धांडे यांच्यात लढत आहे. तर चंद्रपूर अ गटात बाजार समितीचे माजी संचालक दिनेश चोखारे व सुभाष रघाताटे यांच्यात लढत आहे.