नागपूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित विविध प्रकल्पातील हजारो कोटींची कामे केल्यावरही शासनाकडून कंत्राटदारांची देयके दिली जात नाही. आर्थिक विवंचनेत अडकल्याने मध्यंतरी दोन कंत्राटदारांनी आत्महत्याही केल्या होत्या. त्यानंतरही शासनाकडून कंत्राटदारांचे देयके अदा केले गेली नाही. आता दिवाळीला सुरवात झाल्यावरही देयक थकीत असल्याने कंत्राटदारांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनातील कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंत्यांना दिला आहे.

नागपूर काॅन्ट्रेक्टर असोसिएशनकडून हे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष सुबोध सरोदे म्हणाले, कंत्राटदारांकडून राज्यातील विविध भागातील शासकिय वास्तुतील कोट्यावधींची कामे पूर्ण केल्यावरही शासनाकडून देयक अदा केली जात आहे. त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. दिवाळी सारखा महत्वपूर्ण सणातही कंत्राटदारांची देयके प्रलंबित आहे. दुसरीकडे कंत्राटदारांकडील कामगार वारंवार वेतनासह मजूरीसाठी आग्रह धरत आहे. त्यांचे देयक देणे कंत्राटदारांना बंधन कारक आहे.

दरम्यान शासनाकडून देयके न मिळाल्यामुळे कंत्राटदारांची परिस्तिथी दिवसेंदिवस ढासळत असून याचा परिणाम येणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या कामांवर होऊ शकतो. दरम्यान कंत्राटदारावर अवलंबून असलेले नागपूरसह राज्य भरातील बांधकाम साहित्य पुरवठा दार, काम करणारे लेबर कॉन्ट्रॅक्टर, कंत्राटदारांचे कार्यालयीन कर्मचारी, साईट इंजिनियर, सुपरवायझर तसेच बँकेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते यांचे फार मोठ्या प्रमाणात थकीत आहे. या सगळ्यांचे देयक द्यायचे असल्यामुळे सर्व कंत्राटदार प्रचंड मानसिक तणावात आहे. सोबतच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांचेवर आहे. जर देयक मिळत नसेल तर कंत्राटदारांची आर्थिक मानसिक अवस्था काय होत असेल याची शासनाने दखल घेणे अतिशय आवश्यक असल्याचेही सरोदे यांनी सांगितले.

शासनाने कंत्राटदारांचे देयक अदा न केल्यास येत्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, जनार्दन भानुसे यांना संघटनेकडून दिला गेला. दरम्यान या निवेदनाची प्रत मुख्य अभियंता माने, कार्यकारी अभियंता राऊळकर यांनाही दिली गेली.

कंत्राटदारांकडून वेळोवेळी आंदोलन…

कंत्राटदारांची शासनाकडे देयक थकल्यामुळे संघटनेकडून वेळोवेळी निवेदन दिले गेले. त्यानंतरही काही होत नसल्याने प्रथम ५ फेब्रुवारी २०२५ पासून कंत्राटदारांनी प्रलंबित देयकांसाठी काम थांबवून संप केला. त्यापूर्वी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये देयके न मिळाल्याच्या निषेधार्थ कंत्राटदारांनी आंदोलन केले. नागपूरमध्ये देयक न मिळाल्याने कंत्राटदारांकडून भीक मागो आंदोलनही केले गेले.