शेतकऱ्यांच्या तक्रारीत वाढ

नागपूर : भारताची कृषी अर्थव्यवस्था पावसावर अवलंबून आहे आणि पावसाचा अंदाज देणारे हवामान खाते सातत्याने अंदाज चुकवत आहे. त्यामुळे खात्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी यावर्षी देखील तक्रार केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी हवामानाचे अंदाज सातत्याने चुकण्याचे प्रमाण वाढले आहे.

हवामान खात्याने यावर्षी संपूर्ण भारतात ९६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज संपूर्ण भारतासाठी असल्याने काही भागात कमी तर काही भागात अधिक पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, रोजचा पावसाचा अंदाज देखील चुकलेला आहे. राजधानी मुंबईत आतापर्यंत चार ते पाच वेळा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. यातला एकही अंदाज प्रत्यक्षात उतरला नाही. ज्यावेळी  मुंबईत अतिवृष्टी झाली, त्यावेळी अंदाजच दिला गेला नव्हता.

चक्रीवादळाचे हवामान खात्याचे अंदाज फारसे चुकत नाहीत. कारण वादळ निर्माण होऊन येईपर्यंत खात्याला अंदाजासाठी बराच वेळ मिळतो. तीच गोष्ट कमी दाबाच्या पट्टय़ाबाबतही असते. साधारण दोन ते तीन दिवस कमी दाबाचे पट्टे तयार होऊन यायला लागतात. येथेही खात्याला अंदाज देण्यासाठी वेळ मिळतो. तरीदेखील पावसाच्या बाबतीत त्यांचे अंदाज चुकत आहेत.

सलग दोन आठवडय़ात खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला, पण एकदाही तो प्रत्यक्षात उतरला नाही. कमी दाबाच्या पट्टय़ांबाबत राज्य सरकारकडून दिला जाणारा हवामान अंदाज प्रत्यक्षात येत असताना भारतीय हवामान खात्याकडून मात्र गफलत होत आहे. हवामानाची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशावरील स्थितीनुसार अंदाज देण्यावर खात्याचा भर अधिक आहे. मात्र, हवामानात बदल होत असतील तर हवामानाचा अंदाजही त्यानुसार बदलणे अपेक्षित आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये तासानुसार हवामानाचे बदल दिले जातात. भारतात अजूनही पारंपरिक २४ ते ४८ तासांचे मुसळधार पावसाचे अंदाज दिले जात आहेत आणि ते चुकीचे ठरत आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. २०१७ मध्ये बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शेतकरी गंगाभीषण थावरे, २०१८ मध्ये माणिक मदम यांनी, तर २०१९ मध्ये लातूर जिल्ह्यातील शेतकरी सत्तार पटेल, अतुल कुलकर्णी आणि महारुद्र चौंडे यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात हवामान खात्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली आहे.

तासातासांनी अंदाज देणारी यंत्रणा हवी

२४ ते ४८ तासांची हवामानाची स्थिती ही बऱ्याच प्रमाणात अचूक सांगता येते. सध्या हवामानाचे अधिकृत अंदाज नागरिक आणि शेतकऱ्यांपर्यंत प्रसारमाध्यमांकडूनच पोहोचतात. त्यामुळे हे अंदाज त्यांच्यापर्यंत पोहोचेस्तोवर आणखी कालावधी उलटतो. दरम्यान त्या काळात जर हवामानाचे अंदाज सातत्याने बदलले तर ते तितक्या लवकर लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. ही गोष्ट फार गंभीर आहे. कारण आता हवामानाचा तासातासांचा अंदाज देणे जरुरीचे झाले आहे. पण जर ते २४ ते ४८ तासांच्या अंदाजात खात्री नसेल तर तासातासांचा अंदाजात कशी असणार?

– अक्षय देवरस, हवामानतज्ज्ञ