गडचिरोली : सोमवारी अहेरी उपविभागीय कार्यालयाला टाळे ठोकून निम्म्या कर्मचाऱ्यांचा निलंबनाचा प्रस्ताव दाखल केल्याने कर्तव्यनिष्ठ ‘आयएएस’ अधिकारी अशी ओळख असलेले वैभव वाघमारे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ते नुकतेच जिल्ह्यातील अहेरी येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. यापूर्वी ते मेळघाट येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असताना अचानक राजीनामा दिल्याने चर्चेत आले होते. तत्पूर्वी मेळघाटात आदिवासींसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे नागरिकांमध्ये ते बरेच लोकप्रिय आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या बहुतांश अधिकाऱ्यांचा कसेबसे आपला कार्यकाळ पूर्ण करण्याकडे कल असतो. त्यामुळे कार्यालयात कामचुकारपणा वाढला आहे. परिणामी सर्वसामान्यांची अनेक कामे प्रलंबित असल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र सर्वच उपविभागात आहे. परंतु, अहेरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नुकतेच रुजू झालेले आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांनी सोमवारी या कामचुकारपणावर संताप व्यक्त करीत त्यांच्याच कार्यालयाला टाळे ठोकले व कर्मचाऱ्यांचे निलंबन केले. महिनाभरापासून हा सर्व प्रकार ते पाहत होते. अनेकदा त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्नदेखील केला. पण त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. यामुळे अहेरी उपविभागातील कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा – दहावी, बारावीच्या परीक्षेत नेमके बदल काय? कुठल्या भाषा विषयांची सक्ती असणार? जाणून घ्या एका क्लिकवर…

मूळचे पंढरपूरचे असलेले वैभव वाघमारे २०१९ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी आहेत. गडचिरोलीत येण्यापूर्वी ते मेळघाट येथे आदिवासी विकास विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. आदिवासींसाठी मोहफूल बँकसारखे उपक्रम राबवून त्यांनी अल्पावधीत कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख प्राप्त केली. कोरोना काळातही त्यांच्या उल्लेखनीय कार्याची चर्चा झाली. २०२१ मध्ये अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ते देशभरात चर्चेत आले होते. ‘जीवनात काहीतरी अजून चांगले व उदात्त करण्याच्या शोधापोटी आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर निर्णय मागे घेत ते अहेरी येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.

हेही वाचा – रेल्‍वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे; पॉवर ब्‍लॉकमुळे ८ रेल्‍वेगाड्या रद्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल त्यांनी केलेल्या निलंबन कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तर नागरिकांमधून बऱ्याच वर्षांनी गडचिरोली जिल्ह्याला कुणीतरी कर्तव्यनिष्ठ अधिकारी मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.