नागपूर : गावातील निवडणुकीत हार पत्करावी लागल्यामुळे चिडलेल्या पराभूत उमेदवाराने उपसरपंचाचा खून करण्याची चार लाखांत सुपारी दिली होती. मात्र झाडलेल्या गोळीत उपसरपंच जखमी झाले. घटनेच्या चोवीस तासांत स्थानिक गुन्हे शाखेचे तीनही आरोपींना अटक केली. कार्तिक रामेश्वर पंचबुद्धे (२६, मंगरुळ, ता. उमरेड), लक्ष्मण तुकाराम राठोड (४०, तेलकवडसी, उमरेड) आणि अमोल ऊर्फ रामेश्वर विठ्ठल गंधारे (३०, मंगरुळ) अशी आरोपींची नावे आहेत.
उमरेड तालुक्यातील मंगरूळ या ग्रामपंचायतचे उपसरपंच गब्बर देवराव रेवतकर हे आरोपी अमोल गंधारे याच्याविरोधात ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. दोघांमध्ये चांगलीच चुरस झाली होती. दोघांनीही चांगला पैसा खर्च केल्यामुळे निवडणूक गाजली होती. त्या निवडणुकीत अमोलचा पराभव झाला होता. त्यामुळे तो गब्बरवर चिडला होता. तेव्हाच अमोलने गब्बरचा काटा काढण्याचे ठरविले होते. अमोलने गावातील दारुविक्रेता कार्तिक पंचबुद्धे आणि लक्ष्मण राठोड या दोघांना गब्बरला ठार मारण्याची ४ लाखांत सुपारी दिली होती. उपसरपंच हा पहाटे पाच वाजता नियमितपणे फिरायला जात असल्याची माहिती अमोलला होती. लक्ष्मण राठोड हा २३ जानेवारीला अमोलच्या घरी मुक्कामी थांबला. तेथे अमोल, कार्तिक आणि लक्ष्मण यांनी गब्बर यांच्या हत्याकांडाचा कट रचला. दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता लक्ष्मण आणि कार्तिक हे दोघेही पिस्तूल घेऊन गावातील एका रस्त्यावर लपून बसले होते.
उपसरपंच रस्त्याने दिसताच दोघांनीही त्यांचा दुचाकीने पाठलाग केला. काही अंतरावर असतानाच लक्ष्मण याने उपसरपंचावर गोळीबार केला. मात्र, त्यापैकी एक गोळी त्यांच्या अंगाला चाटून गेल्याने ते जखमी झाले. गोळीबार केल्यानंतर दोघांनीही दुचाकीने पळ काढला. जखमी गब्बर यांना नागरिकांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे, भगत, मयूर ढेकले, चौधरी, रणजीत जाधव, सुमित बांगडे आणि आशूतोष यांनी केली.