नागपूर : बालपणात लठ्ठ असलेल्या ७० टक्के मुलांमध्ये तरुण झाल्यानंतर लठ्ठपणा कायम राहतो, असे धक्कादायक निरीक्षण ऑल इंडिया असोसिएशन फाॅर ॲडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी संघटनेकडून (एआयएएआरओ) नोंदवण्यात आले आहे.

‘एआयएएआरओ’तर्फे नागपूरात १ ते ३ डिसेंबरदरम्यान एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रपरिषदेत मधुमेहरोग तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणाले, देशात लठ्ठपणाकडे पूर्वी गांभीर्याने बघितले जात नव्हते. परंतु, लठ्ठ व्यक्तीला मधुमेहासह इतरही आजारांची जोखीम जास्त आहे. भारतात साधारणपणे एकूण लहान मुलांपैकी १२.४ टक्के मुलांमध्ये लठ्ठपणा आढळतो. या मुलांपैकी सुमारे ७० टक्के जणांमध्ये तरुणपणी लठ्ठपणा कायम राहतो. तर ३० टक्के मुलांचा लठ्ठपणा जात असल्याचेही निरीक्षण नोंदवले गेले आहे.

हेही वाचा : नक्षलवाद्यांचे ‘हमास’ला समर्थन, छत्तीसगड सीमेवर लावले फलक

डायबेटिज असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. अमोल मेश्राम म्हणाले, आपल्याकडे लठ्ठपणाला आजार म्हणूनच बघायला हवे. खाणपानाच्या वाईट सवयी बदलण्यासह नित्याने व्ययाम व आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास लठ्ठपणा कमी होऊ शकतो. अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. अजय अंबाडे म्हणाले, १ ते ३ डिसेंबर दरम्यान नागपुरात लठ्ठपणावर मोठी परिषद होणार आहे. त्यानुसार १ डिसेंबरला व्हर्च्युअल तर २ आणि ३ डिसेंबरला येथील हाॅटेल रेडिसन ब्लूमध्ये परिषद होईल. त्याला ऑनलाईन पद्धतीने वर्ल्ड ओबेसिटी फेडरेशनच्या अध्यक्ष व मुळात ऑस्ट्रेलिया येथे राहणाऱ्या डॉ. लुईस बौर उपस्थित राहतील. कविता गुप्ता म्हणाल्या, परिषदेत लठ्ठपणावरील विविध उपचार, आहार, व्यायाम आणि इतरही पद्धतींवर सविस्तर व्याख्यान व चर्चात्मक कार्यक्रम होईल. डॉ. सचिन गाथे यांनीही यावेळी आपले मत मांडले.

हेही वाचा : ‘किसान रेल्वे’ बंद झाल्याने कृषीमाल वाहतुकीला फटका

या संघटनांचा सहभाग

ऑल इंडिया असोसिएशन फाॅर ॲडव्हान्सिंग रिसर्च इन ओबेसिटी संघटनेतर्फे लठ्ठपणावर आयोजित परिषदेत डायबेटिज केअर फाऊंडेशन ऑफ इंडिया, अकादमी ऑफ मेडिकल सायंसेस, डायटेटिक असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन डायटेटिक असोसिएशन (नागपूर शाखा) या संघटनांचाही सहभाग आहे.