नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरात नवनवीन सिमेंट रस्ते, उड्डाणपूल व इतर प्रकल्पांचे काम जोरात सुरू आहे. परंतु या विकासकामादरम्यान उडणाऱ्या धुळीचा फटका नागपूरकरांना बसत असून श्वसनविकाराचे रुग्ण सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहेत. क्रिम्स रुग्णालय आणि नागपुरातील विविध श्वसनरोग तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समाेर आली आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून नागपुरात खूप झपाट्याने विकास कामे सुरू आहे. परंतु त्यामुळे पर्यावरण संदर्भात समस्या उद्भवतांना दिसत आहे. नागपुरातील क्रिम्स रुग्णालयासह शहरातील श्वसनरोग तज्ज्ञांकडे उपचाराला आलेल्या रुग्णांची पार्श्वभूमी तपासली असता असे लक्षात आले की, विकासकामे सुरू असलेल्या भागात खोकला, दमा वाढणे आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजचे रुग्ण वाढत आहेत. साधारणपणे उन्हाळ्यात श्वसनविकार असणाऱ्यांना जास्त त्रास होत नाही. पण, यंदा उलट घडत आहे. त्याला प्रामुख्याने वायू प्रदूषण जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शहरात आधीच वाहनांची संख्या वाढली आहे. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांमधून नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि सूक्ष्म कण (पार्टिक्युलेट मॅटर) यासारखे हानिकारक प्रदूषक हवेत मिसळत आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात घसरली आहे. परिणामी, आधीपासूनच श्वसनविकार असणाऱ्यांचा त्रास आणखी वाढला आहे.
सिमेंट रस्ते आणि उड्डाणपूल टिकाऊ आणि हवामान प्रतिरोधक असले तरी हे सूक्ष्म धूळ आणि कण हवेत पसरवणारे मोठे स्रोत आहेत. बांधकामाचा मलबा आणि धूळ फुफ्फुसात खोलवर जाऊन खोकला, घसा खवखवणे, दमा, ब्रॉन्कायटिस आणि हृदयविकारही वाढवते. बांधकाम आणि पाडकामामुळे सिलिका आणि फ्लाय ॲशसारखी धूळ हवेत मिसळते. जी विशेषतः लहान मुले आणि वृद्धांसाठी धोकादायक असल्याचेही या अभ्यासातून पुढे आले आहे.
ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट काय म्हणतात?
“विकासकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे श्वसनविकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशी कामे व प्रदूषणमुक्ती यात संतुलन साधायला हवे. त्यासाठी हिरव्या पट्ट्यांचा विस्तार करणे आणि सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. हवेची गुणवत्ता सुधारणे हे केवळ तांत्रिक आव्हान नाही तर शहराच्या भविष्यासाठीही अपरिहार्य आहे. त्यासाठी नागरिकांनीही प्रदूषणाचा परिणाम कमी करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत नागपुरातील ज्येष्ठ श्वसनरोग तज्ज्ञ व क्रीम्स रुग्णालयाचेसंचालक डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले.