यवतमाळ : माणसे आजारी पडली तर ते दवाखान्यात जातात. औषधं घेतात आणि बरे होतात. त्याचप्रमाणे पुस्तकंसुद्धा आजारी पडतात, फाटतात, जीर्ण होतात, त्याचा कणा मोडतो. त्यांची वाईट अवस्था बघूनही अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र धनगरवाडी (ता.कळंब) येथील बालनगरीमधील विद्यार्थ्यांनी चक्क पुस्तकांसाठी दवाखाना उघडला आहे. आता पुस्तके आजारी पडली की, बालनगरीतील मुलं त्यांच्यावर उपचार करताना दिसतात.
यवतमाळच्या धम्मानंद आणि प्रणाली जाधव या जोडप्याने कोविड काळात २०२० मध्ये धनगरवाडीतील मुलांसाठी संध्याकाळची शाळा सुरू केली. धनगरवाडीतील बहुतांश कुटुंब ही मेंढ्या पाळून भटकंती करत उदरनिर्वाह करतात. त्यामुळे ते गावात कमी आणि भटकंतीवर अधिक असतात. या कुटुंबातील मुले शिकावी यासाठी धम्मानंद आणि प्रणाली यांनी गावातच एका पडक्या जागेत भटक्या मुलांची शाळा भरविण्यास सुरुवात केली. या प्रयोगाला गावातील मुलांचा आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आणि हे काम कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी ओवी ट्रस्टची स्थापना करण्यात आली. अनेक दिवस संघर्षात काढल्यानंतर गावकरी आणि समाजातील दातृत्वशील व्यक्ती, संस्थांच्या मदतीने बालनगरीस आता गावातच हक्काचे छप्पर मिळाले आहे. बालनगरीत सध्या ११० मुलं आहेत. वंचित आणि उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यात शिक्षण, जीवन मूल्य व कौशल्ये रुजविण्यासाठी बालनगरी अस्तित्वात आल्याची माहिती ओवी ट्रस्टचे प्रणाली व धम्मानंद यांनी दिली.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपले, १३ हजार ३९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
ओवी ट्रस्टच्या माध्यमातून बालनगरीत विविध उपक्रम सुरू असतात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे पुस्तक वाचन. ‘पुस्तकं’ हा बालनगरीचा अविभाज्य घटक आहे. पुस्तकं येथील मुलांचे सोबती झाले आहेत. बालनगरीत असा एकही दिवस नाही ज्यादिवशी मुलं पुस्तकं वाचत नाहीत किंवा सहज हाताळत नाहीत. येथील ताई – दादा मुलांना दररोज पुस्तकं वाचून दाखवतात. सहभागी वाचन, प्रकट वाचन या नित्यनियमित कार्यक्रमामुळे मुले आता वाचक होऊ लागली आहेत. या कृतीमुळे मुलांचं पुस्तकं वाचणं, त्याची नोंद ठेवणं, पुस्तकातील काय आवडलं, नाही आवडलं किंवा का आवडलं? यावर चर्चा करणं, आपली मते मांडणं, पुस्तकातील कथेचं नाट्य सादरीकरण करणं, पुस्तकातील चित्रे हुबेहूब काढून बघणं, त्याचबरोबर ज्याप्रमाणे एखाद्या सिनेमाघराबाहेर सिनेमाचे पोस्टर लावलेलं असतं त्याप्रमाणे गोष्टीच्या पुस्तकाचं आकर्षक पोस्टर तयार करणं, जेणेकरून इतरांना ते पुस्तक वाचण्यासाठी प्रेरणा मिळेल. अशा अनेकानेक गोष्टी ‘पुस्तक’ या एका घटकाभोवती बालनगरीमध्ये मुले करून पाहत असतात.
हेही वाचा : वर्धा : फसवणूक करीत मंडळाचे विश्वस्त झाले; सात जणांविरोधात गुन्हे दाखल
पुस्तकातील पात्र, लेखक, चित्रकार, प्रकाशक हे मुलांसाठी महत्वाचे झालेत. माधुरी पुरंदरे या येथील मुलांच्या सर्वात आवडीच्या आणि लाडक्या लेखिका आहेत. त्यांची पुस्तके वाचताना मुलं पुस्तकमयी जगात एकदम हरवून जातात. या डिजीटल युगातही पुस्तकं बालनगरीतील मुलांचे आवडते मित्र झाल्याचे चित्र येथे बघायला मिळते. दिवाळीत मुलांनी पुस्तकांचा अक्षरशः फडशा पाडला. पुस्तके चाळून चाळून जीर्ण झाल्याचे मुलांच्या लक्षात आले आणि त्यातीलच काही मुलांनी पुस्तकांच्या दवाखान्याची कल्पना अंमलात आणली, अशी माहिती ओवी ट्रस्टच्या प्रणाली जाधव यांनी दिली. सोमवारपासून मुलं आणि ताई दादा मिळून पुस्तकांना चिटकवून, शिवून, कव्हर घालून त्यांना ताजेतवाने करण्याचे काम बालनगरीमध्ये सुरू आहे.