यवतमाळ – जिल्ह्यात पोलिसांनी उघडलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत अंमली पदार्थांच्या तस्कीरीची आंतरराज्यीय साखळी शोधत एका आरोपीस थेट मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरून अटक केली. अय्युब उर्फ अली खान (४०) रा. बोरखेडा, ता. पिपलोदा, जि. रतलाम (मध्यप्रदेश) असे या तस्कराचे नाव आहे. त्याच्या अटकेनंतर विदर्भातील अंमली पदार्थाच्या तस्करीचे थेट सीमेपार धागेदोरे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कळंब येथून सुरू झालेल्या या प्रकरणी यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत तिघांना अटक करून आठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. १५ दिवसांपूर्वी कळंब येथील अंमली पदार्थ प्रकरणात अभय राजेंद्र गुप्ता (३०) रा. बुटीबोरी (नागपूर) याला अटक केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इस्तीयाक हुसेन मुस्तफा हुसेन उर्फ इस्तीयाक खातीब (४५) रा. बडा ताजबाग हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यालाही अटक केली. अंमली पदार्थांच्या तस्करीची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यात विदर्भातील मुख्य तस्कर अय्युब खान उर्फ अली खान याचे नाव तपासात पुढे आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेश येथे जाऊन अली खान याची माहिती घेत असता तो मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरील भावगढ येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, नीलेश राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे, महेंद्र साळवे, मंगेश ढबाले यांनी भावगढ येथे कारवाई करत अय्युब खान उर्फ अली खान याला अटक केली. या कारवाईनंतर विदर्भातील एमडी ड्रग्जचे आंतरराज्यीय रॅकेट पोलिसांच्या निशाण्यावर आले आहे.
मध्यप्रदेशमधील मंदसौर व राजस्थान येथील प्रतापगढ व निमोज हे जिल्हे एमडी ड्रग्ज तस्करीचे प्रमुख केंद्र असल्याचे तपासात पुढे आले. या जिल्ह्यांमध्ये जवळपास ५० च्या वर तस्कर असल्याची माहिती आहे. हे जिल्हे अफीम लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. येथील अफिम शेतीवर केंद्रीय नार्कोटेस्ट ब्युरोचे नियंत्रण असले तरी, अनेकजण अफिमच्या आड येथे एमडी ड्रग्जचा व्यापार करत असल्याची माहिती आहे. अफिम, ब्राऊन शुगर यापेक्षा एमडी ड्रग्ज स्वस्तात मिळत असल्याने या तस्करीत अनेकजण गुंतले आहेत. तरूणांना एमडी ड्रग्ज सहज मिळत असल्याने तरूण पिढी या ड्रग्जच्या विळख्यात सापडली आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांतून लहान शहरात व ग्रामीण भागात एमडी ड्रग्जची तस्करी होत आहे. विदर्भातील कारागृहातील कैद्यांच्या माध्यमातून आंतरराज्यीय ड्रग्ज तस्करांचे जाळे विणले जात असल्याची महत्वपूर्ण माहिती चौकशीत समोर आली आहे. विदर्भातील तालुका-गावापर्यंत पोहोचलेले अंमली पदार्थाचे जाळे उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश येईल का, हे लवकरच कळेल.