नितीन पखाले, लोकसत्ता
यवतमाळ : महाराष्ट्राच्या राजकारणात देशमुख विरूद्ध पाटील हा राजकीय वाद नवा नाही. महाराष्ट्राचे एकुणच राजकारण अलिकडेपर्यंत देशमुख, मराठा, कुणबी (डीएमके) या समाजाभोवती फिरत आले आहे. यावेळी यवतमाळ जिल्ह्यात अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा देशमुख विरूद्ध पाटील, हा राजकीय सामना रंगणार आहे. जिल्ह्यात कुणबी, मराठा, देशमुख समाजाचे राजकारण संपले असे वाटत असतानाच यावेळी लोकसभा निवडणुकीत याच समाजाचे उमदेवार आमने-सामने आले आहेत.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दुहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले. जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत देशमुख, मराठा, कुणबी (डीएमके) विरूद्ध बंजारा व इतर समाज अशा समीकरणांनी निवडणूक लढली जायची. यावेळी प्रथमच निवडणुकीत देशमुख विरूद्ध कुणबी समाज अशी थेट लढत होत आहे. या दोन्ही समाजाने आपापल्या उमदेवारासाठी कंबर कसल्याचे दिसत आहे. महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील-महल्ले या तिरळे कुणबी समाजातील आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात तिरळे कुणबी समाजातील नेत्यांनी अनेक वर्षे सत्ता गाजवली. काँग्रेसमधील अंतर्गत पाडापाडीच्या वादात पुढे कुणबी राजकारण संपुष्टात आले. यासोबतच जिल्ह्याच्या राजकारणाची महत्वाची सुत्रे ही बंजारा समाजाकडेही राहिली आहेत. जिल्ह्यात मराठा, कुणबी समाजाला महत्वाची राजकीय संधी मिळणारच नाही, असे चित्र असताना यावेळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संजय देशमुख यांना संधी देवून देशमुख समाजाला राजकारणात सक्रिय केले. देशमुख यांच्या विरोधात बंजारा समाजाचा उमदेवार देण्याची तयारी महायुतीने केली. मात्र विजयाचे गणित जुळत नसल्याने शेवटी कुणबी कार्ड टाकले. मतदारसंघात तिरळे कुणबी समाजाचा प्रभाव बघून शिवसेनेकडून राजश्री हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली गेली.
शिवसेना शिंदे गटाने हा डाव टाकून ‘डीएमके’ समाजात फूट पाडत मतांचे विभाजन करण्याची खेळी खेळण्यात आली. जिल्ह्यात निव्वळ कुणबी समाजाची मते ही पाच लाखांच्या घरात आहे. ही मते महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुणबी मतांच्या तुलनेत मराठा आणि देशमुख समाजाची मते कमी आहेत. मतदारसंघातील राळेगाव, बाभूळगाव, कळंब, दारव्हा, नेर, दिग्रस, कारंजा, वाशिम हा कुणबीबहुल पट्टा आहे. यवतमाळात संमिश्र समाजाचे मतदार आहेत. पुसद परिसरात देशमुख, मराठा वर्चस्व आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ओबीसी विरूद्ध मराठा या वादाने ओबीसी प्रवर्गात येते असलेला बहुसंख्य कुणबी समाज मराठा समाजावर नाराज आहे. त्याचा थेट फटका महाविकास आघाडीचे उमदेवार संजय देशमुख यांना बसण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाची मते खेचणारा प्रभावी चेहराही महाविकास आघाडी व देशमुख यांच्याकडे नाही.
आणखी वाचा-सुधीर मुनगंटीवार-किशोर जोरगेवार यांचे मनोमिलन; लोकसभा निवडणुकीत प्रचार करणार
महाविकास आघाडीत काँग्रेसमध्ये बहुसंख्य नेते हे तिरळे कुणबी समाजाचे आहेत. त्यामुळे समाजाच्या राजकीय वर्चस्वासाठी हे नेते शेवटच्या क्षणी काय राजकीय भूमिका घेतात, हेही महत्वाचे ठरणार आहे. महायुतीच्या उमदेवार राजश्री पाटील यांच्याकडे तिरळे कुणबी पाटील म्हणून असलेली ओळख, बंजारा समाजातील नेत्यांची साथ, भाजप, संघाची गठ्ठा मते या जमेच्या बाजू आहेत. सत्ताधारी भाजपचे सहा आमदार, त्यात आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार, शिवसेनेची गाव पातळीवरील संघटनात्मक बांधणी, भाजपाचे बुथ स्तरावरील कार्यकर्ते आणि अजुनही मोदींच्या प्रभावाखाली असलेला शहरी व युवा मतदार अशी मोठी फळी महायुतीच्या बाजूने दिसत आहे. कॅडरबेस मते असलेल्या वंचितचा उमदेवारच निवडणुकीतून बाद झाल्याने ही मतेही आता विभाजित होण्याची शक्यता आहे. अल्पसंख्याक व आदिवासी समाज आणि बहुसंख्य शेतकरी शिंदेंच्या शिवसेनेस पोषक असले तरी हे घटक भाजपवर नाराज आहेत. या निवडणुकीत ही मते निर्णायक ठरणार आहेत. ही मते जो उमेदवार आपल्या पारड्यात पाडून घेईल, त्याचा विजय सुकर होण्याची शक्यता आहे.