नागपूर : राज्यातील बहूतांश भागांमध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. एकीकडे मुंबई, कोकणात पावसाने धुमाकूळ घातला असतानाच विदर्भातील वाशिम, बुलढाणा, अकोला या शहरांमध्ये देखील पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच आता पुन्हा एक नवा इशारा पावसाने दिला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात शहरासह राज्याच्या बहुतांश भागात पाऊस हजेरी लावणार आहे.
तर मुंबई शहर आणि उपनगरांसह, पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, उर्वरीत भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
२७ जुलैपर्यंत हेच वातावरण कायम असणार आहे. कोकणातील अंतर्गत भाग आणि उत्तर कोकणामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. कोकणाचा दक्षिण भाग आणि गोव्याच्या किनारपट्टीवरही पावसाचा जोर वाझणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रालाही पावसाच्या जोरदार सरी झोडपणार आहेत. यादरम्यान घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची हजेरी असेल.
भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये २२ ते २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळीवारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. २३, २४ व २६ जुलैला “येलो अलर्ट” तर २५ जुलैला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असुन या कालावधीमध्ये काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विजगर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये भ्रमणध्वनी सोबत बाळगू नये. विजगर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व विज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप खांडे यांनी केले आहे.
नदी, नाले, दुथडी भरून वाहत असतात तेव्हा पाणी पुलावरून किंवा रस्त्यावरून वाहत असते, अशा वेळी चुकूनही तो पुल किंवा रस्ता चालत किंवा गाडी मधुन ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६२६६८ येथे संपर्क साधावा.