नागपूर : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदार रेल्वे सुरक्षा दलाची (आर.पी. एफ) असते. गेल्या वर्षभरात धावत्या रेल्वेत देशभर ७ लाख१७ हजार ३२८ गुन्ह्यांची नोंद घेतली गेली. यात ६ लाख ८२ हजार १०४ जणांचा दोष सिद्ध झाला. दोषी ठरवण्याचे हे सरासरी प्रमाण ९५ टक्के पेक्षा अधिक आढळले. महाराष्ट्रात रेल्वे प्रवासादरम्यान गुन्हेगारी स्वरुपाच्या १ लाख ४६ हजार ६२६ घटनांची नोंद झाली.

रेल्वे प्रवासात गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानी आढळले असले तरी झारखंडमध्ये गुन्ह्यांची सरासरी ही लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक आहे. तीन वर्षांची सरासरी काढली तर झारखंड हे राज्य गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात ११८ टक्क्यांमध्ये वाढ झाल्याची नोंद घेण्यात आली. महाराष्ट्रात रेल्वे प्रवासात दाखल एकूण गन्ह्यांपैकी १ लाख ४६ हजार ८१४ जणांना अटक झाली. हे गुन्हे करणाऱ्या १ लाख ४४ हजार ९२७ जणांवर आरोपपपत्र दाखल झाले. यातून सर्वाधिक १ लाख ४५ हजार जण दोषी आढळले. रेल्वे गुन्ह्यांत महाराष्ट्रातला दोष सिद्धीचा हा अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक आहे.

महाराष्ट्र खालोखाल न्यायप्रक्रियेत ९९ टक्के यशस्वी दर गुजरातचा आहे. गुजरातमध्ये दाखल ८० हजार ३०४ गुन्ह्यांपैकी ७४ हजार ४२७ जण दोषी आढळले. तर झारखंडमध्ये ४६ हजार ४०२ गुन्हे नोंदवले गेले. यातून ४६ हजार ७ जणांना दोषी ठरवण्यात आले. पश्चिम बंगालमध्ये रेल्वे गुन्हे कायद्याखाली ६६ हजार ७४३ जणांना अटक झाली. त्यात ६२ हजार २२६ जण दोषी ठरले.

हिमाचल प्रदेशमध्ये रेल्वे गुन्ह्यांचे प्रमाण कमी असूनही दोषी ठरवण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हिमाचल प्रदेशमध्ये फक्त ५० गुन्ह्यांची नोंद झाली. यातील ९९ टक्के गुन्हेगार दोषी आढळले. रेल्वे जाळे विस्तारिकरणात कमी सक्रिय इशान्येकडी राज्यांमध्ये अरुणाचल, मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम सारखी राज्ये तर केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप, दिव दमण क्षेत्रांमध्ये गुन्हे नोंदवलेच गेले नाहीत. त्यामुळे आरपीएफच्या उपस्थिती, संसाधनांची उपलब्धता आणि जागरूकता याबाबत प्रश्न उपस्थित होतात.

रेल्वे प्रवासात नोंद झालेले देशातील एकूण गुन्हे

वर्ष- गुन्हे

  • २०२०-२,५४,६३६
  • २०२१-४,२४,०२७ (६६.५)
  • २०२२- ७,१७,३२८ (६९.१)

राज्य- २०२०-२०२१- २०२२ – सरासरी

  • झारखंड- ५,०९४-१३,२२३- ४६,४०२- ११८.०६
  • महाराष्ट्र- ६८,२१५-९६,६४८- १,४६,६१२ -११६.०६
  • गुजरात- १९,६१५- ४९,५८७- ८०.३४६-१११.३
  • छत्तीसगढ- ४,८९७-१४,१५६- ९८.०१
  • मध्य प्रदेश- १९,०९९- ३३,९८२- ५९,९८६- ६९.०८
  • केरळ- ७,९९७- १५,१३७- २२,६८८- ६३.०६
  • दिल्ली- ४,७५८- ८,६९२- १३,४२५- ६३.०६
  • पश्चिम बंगाल- १३,९३२-३०,१४९- ५६,७७५- ५७.०५
  • ओडिशा- ६,४१४- ८,९९२- २२,२९० ४८.०४
  • तमिळनाडू- १२,०३६- १८,६४७- ३१,७०१-४१.०३

लांब पल्याच्या धावत्या रेल्वेत सातत्याने गस्त वाढवली जात आहे. बेकायदेशी कृत्यांना आवर घालता यावा यासाठी प्लॅटफॉर्म सुरक्षेवर भर देऊन कुली, व्हेंडर्सना सक्त ताकिद दिली गेली आहे. सीसीटिव्ही वाढविण्यात आले आहे. रेल्वे जवळ वापरणाऱ्यांना समुह पोलीसींचे प्रशिक्षण दिले जात आहे. – मनोज कुमार, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे संरक्षण दल.