भंडारा : लग्नाआधीच प्रियकर त्रास देत असल्याचे पत्नीने नवऱ्याला सांगितले. हे कळताच नवरा मित्रांना घेऊन त्याचा काटा काढायला निघाला. पण वाटेतच एलसीबीच्या पथकाने त्यांना गाठले. विवाहानंतरही संबंधित तरुणीचा लग्नापूर्वीच प्रियकर तिला वारंवार फोन करून आणि मेसेज करून त्रास देत होता. यामुळे विवाहित महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. पत्नीला त्रास देणाऱ्या तिच्या प्रियकराचा काटा काढण्याकरीता निघालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याच्या दोन मित्रांना भंडाऱ्यात दोन जिवंत काडतुस आणि एका पिस्तूलासह एलसीबी पथकाने एका ढाब्यावर पकडले. पोलिसांना बघून कारमधील युवकांनी हातातील पिस्तूल लपविण्याची झटापट करताच एक मिसफायर झाले. यात कोणी जखमी झाला नाही. मात्र एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली असून या सगळ्या प्रकारामुळे भंडाऱ्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नक्की घडले काय?
पत्नीला तिचा लग्नापूर्वीचा प्रियकर त्रास देत असल्यानं त्याचा काटा काढण्याकरिता निघालेल्या विवाहितेच्या पतीसह त्याचे दोन मित्र अशा तिघांना भंडाऱ्याच्या एलसीबीच्या पथकानं अटक केली. ही कारवाई लाखनी तालुक्यातील मानेगाव येथील पाल ढाब्यावर केली. त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतूस, एक खाली काडतूस, चार मोबाईल आणि घटनेसाठी वापरलेली कार असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन तुमसरचे तर, एक भंडारा येथील रहिवासी आहेत.
तुमसर तालुक्यातील एका ढाबा चालकाचा काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील तरुणीशी विवाह झाला होता. विवाहानंतरही संबंधित तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड तिला वारंवार फोन करून आणि मेसेज करून त्रास देत होता. यामुळे विवाहित महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. पत्नीला त्रास देणाऱ्या त्या युवकाला धडा शिकवण्यासाठी पतीने आपल्या दोन मित्रांसह गोंदियाकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र गोंदियाकडे निघण्याआधी हे तिघे मानेगाव येथील पाल ढाब्यावर थांबले होते. त्याचवेळी एलसीबीचे पथक तिथे पोहोचले. पोलिसांनी कारची तपासणी करण्याचा प्रयत्न केला असता कारमधील युवकांनी पिस्तूल लपविण्याचा प्रयत्न केला. झटापटीत एक गोळी मिसफायर झाली, मात्र सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. पोलिसांनी या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतूस, एक रिकामं काडतूस, चार मोबाईल फोन आणि कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.