नागपूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे – पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा नेण्याचे जाहीर केले. मात्र, जरांगेंना परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची, तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांना मुंबईऐवजी खारघर येथील जागेचा आंदोलनासाठी पर्याय द्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यातच आणखी मोठी बातमी पुढे येत आहे. विदर्भातील मराठा समाजाच्या नवीन निर्णयाने शासनाची अडचण वाढणार आहे.
मराठा समाज संघटनेतर्फे मंगळवारी एक प्रसिद्धपत्र जारी करण्यात आले . त्यात स्पष्ट केले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लाखो मराठे विदर्भातून मुंबईला जाणार आहेत ते मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात सहभागी होईल. त्यासाठी मुंबईकडे कुच करू. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, असा संकल्प विदर्भातील मराठ्यांनी केला आहे. मराठा समाज गणपती विसर्जन मुंबईतच करणार. सगे सोयरे हैदराबाद गॅझेट लागू करावे आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला दोन हजार कोटी मंजूर करावेत.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी होस्टेल बांधावेत या मागणीसाठी विदर्भातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामधून प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे ठाम उभा आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहिल. जोपर्यंत मराठ्यांना ओबीसी तून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणतीच भरती किंवा पोलीस भरती होऊ देणार नाही, असा निर्धारही मराठा समाजाने घेतला. मराठा- कुणबी, कुणबी- मराठा हा एकच आहे. मराठाही कुणबी पोट जात असून तसेच मोठा भाऊ मराठा आहे. आता एकच पर्याय लढेंगे जितेंगे हम सब जरांगे पाटील, असेही प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले.
आंदोलनात वर्धा जिल्ह्यातून संदीप भांडवलकर राज्य समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या नेतृत्वात तसेच अमरावती जिल्हा अंबादास काचोळे राज्य समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या नेतृत्वात, नागपूर जिल्ह्यातून उमेश घाडगे राज्य समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा विदर्भ प्रमुख छावा मराठा युवा संघटना तसेच भाग्यश्री शिर्के महिला राज्य समन्वयक मराठा क्रांती ठोक मोर्चा व विदर्भ महिला अध्यक्ष छावा मराठा युवा संघटना महिलांचे नेतृत्व करणार असेही उमेश घाडगे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.