यवतमाळ : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचा वाढदिवस आज सोमवारी जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त संजय राठोड यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वत्र फलकबाजी केली आहे. मात्र या फलकांमध्ये एका चिमुरडीचे फलक लक्षवेधी ठरले आहे. तिच्या फलकावरील मजकूरही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे.

‘माझे विठ्ठल रखुमाई’ असा शुभेच्छा संदेश देत तनिष्का घनश्याम नगराळे या चिमुरडीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्यामागे कारणही तसेच आहे. समाजसेवक आणि रुग्णसेवक म्हणून असलेली ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी रुग्णसेवक म्हणून त्यांनी समाजकार्यात आपला ठसा उमटवला होता. आजही ही तळमळ त्यांच्या कामातून प्रकर्षाने जाणवते, याचा अनुभव त्यांच्या स्वीय सहाय्यकाच्या कुटुंबाला नुकताच आला.

संजय राठोड यांचे स्वीय सहाय्यक घनश्याम नगराळे यांची ११ वर्षीय मुलगी तनिष्का ही नागपूरमधील एका नामांकित खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. मात्र, १० दिवसांपर्यंत ठोस निदान न मिळाल्यामुळे तिच्यावर जड औषधांचे प्रयोग सुरू ठेवण्यात आले. तिची प्रकृती गंभीर होत गेली आणि तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू होते मात्र निदान लागत नसल्याने पालक आणि नातेवाईक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचले होते. या गंभीर प्रसंगी उपचार प्रक्रियेत वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अपुरी तयारी, अस्पष्ट उपचारयोजना आणि दुसऱ्या मतासाठी रिपोर्ट देण्यास टाळाटाळ अशा अनेक त्रुटीही उघड झाल्या.

ही बाब मंत्री संजय राठोड यांना कळताच त्यांनी नगराळे कुटुंबियांशी संवाद साधत तनिष्कला तातडीने मुंबई येथे हलविण्याच्या सूचना केल्या. हिंदुजा रुग्णालयात डॉक्टरांशी सल्लामसलत करून तनिष्काला एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्थाही करून दिली. मुंबईत तनिष्काच्या आजाराचे योग्य निदान होऊन उपचारही झाले. तिची प्रकृती लक्षणीय सुधारली आणि तिला नवीन आयुष्य मिळाले. संजय राठोड यांनी पत्नी शीतल राठोड यांच्यासह दवाखान्यात जावून तनिष्काच्या आरोग्याची विचारपूसही केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या स्वीय सहाय्यकाला अडचणीत मदत करणे हे मंत्री म्हणून संजय राठोड यांचे कर्तव्य असले तरी, माणूस म्हणून संवेदनशीलता दाखवत त्यांनी तत्परतेने केलेल्या या मदतीची मतदारसंघात चर्चा आहे. मतदारसंघातील जनतेच्या आरोग्यसेवेसंदर्भातही संजय राठोड कायमच दक्ष असतात. दरवर्षी मतदारसंघात आरोग्य शिबिर आयोजित करून सर्वसामान्य जनतेला सावंगी, सेवाग्राम, नागपूर, मुंबई आदी ठिकाणी सातत्याने उपचारांसाठी पाठवतात. मंत्री संजय राठोड यांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळालेल्या तनिष्काने आपल्या भावनांना शब्दातून वाट मोकळी करून दिली आणि तिचे हे फलक चर्चेचा विषय ठरले.