नागपूर : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपण्यासाठी अजून दोन दिवसांचा कालावधी बाकी आहेत. मात्र, हा दोन दिवसाचा कालावधी बाकी असताना कामकाजाऐवजी आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेली देवांची उपमा अधिक चर्चेत आहे.
‘विकसित महाराष्ट्र ॲट २०४७’ वर विधानसभेत चर्चा सुरू होती. उपमुख्यमंत्री अजित पवार विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहेत हे सांगत होते. त्याचवेळी मेळघाटसारख्या प्रदेशातील स्थानिक समस्यांचा मुद्दाही विधानसभेत गाजला. एकीकडे विरोधक विविध मुद्यांवरुन सरकारला धारेवर धरत असताना आमदार परिणय फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांची तुलना प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, हनुमान, सुर्य, चंद्राशी केली.
मुख्यमंत्र्यांना देवांच्या उपमा देताना आमदार फुके म्हणाले, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना चक्रव्यूह भेदणाऱ्या अभिमन्यूशी केली होती. प्रत्यक्षात ही उपमा अतिशय छोटी आहे. कारण प्रभू श्रीराम जसे आदर्शवत व्यक्तीमत्त्व होते, तसेच आदर्शवत व्यक्तीमत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचे आहे. श्रीकृष्णासारखे चारित्र्य, चातुर्य, बुद्धी मुख्यमंत्र्यांची आहे. एवढेच नाही तर देवाधिदेव महादेवासारखी सहनशक्ती त्यांच्यात आहे. महादेवासारखी वीष पचवण्याची ताकद त्यांच्यात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखे शीतल असल्याचे विधान परिणय फुकेंनी केले. विधान परिषदेच्या चर्चेदरम्यान आमदार परिणय फुकेंच्या या वक्तव्यांची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमावर चांगलीच सामाईक झाली असून त्यावर विविध प्रकारच्या कमेंट्स देखील वाचायला मिळत आहेत.
फुके यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करताना मराठा साम्राज्याचे ऐतिहासिक नेते नाना फडणवीस हे त्यांच्या काळातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याशीही फुकेंनी फडणवीसांची तुलना केली. फुके यांनी देवेंद्र फडणवीसांची कार्यशैली आणि नेतृत्वावर जोर देत त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील यश आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
फुके यांचे हे विधान सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. फुकेंच्या या वक्तव्यांवर उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. फुके यांच्या या वक्तव्यानंतर समाज माध्यमांवर फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक आणि काही प्रमाणात वादग्रस्त प्रतिक्रिया उमटलेल्या दिसून येत आहे. काहींनी याला त्यांच्या लोकप्रियतेचे द्योतक मानले, तर काहींनी याला राजकीय रणनीतीचा भाग म्हणून त्यावर कमेंट केली आहे. तर विरोधकांनी परिणय फुकेंच्या या विधानावर टीका केली आहे.