राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून शैक्षणिक शुल्कामध्ये २० टक्के वाढ करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यामुळे, विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये हे अतिरिक्त शुल्क वसूल करू शकतील, असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, ९०० कोटींची रोख जमा असताना विद्यापीठाने कुठल्या अधिकारात अशी शुल्कवाढ केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

२०२३-२४ शैक्षणिक सत्रासाठी शुल्कामध्ये आणखी ७ टक्के वाढ करण्यात येणार –

पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विद्यापीठाचा हा निर्णय आला आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी थेट २० टक्के तर २०२३-२४ शैक्षणिक सत्रासाठी शुल्कामध्ये आणखी ७ टक्के वाढ करण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांकडून २० टक्के वाढीव शुल्क आकारावे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

आता अनुदानित महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि गृहविज्ञानाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १८ हजार ५४७ रुपये शिकवणी शुल्क तर १२ हजार ३६५ रुपये प्रयोगशाळा शुल्क भरावे लागतील. खासगी महाविद्यालयात बी.ए. एल.एल.बी. करण्यासाठी आता ४१ हजार २६१ रुपये शिकवणी शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे एम.ए. मास कम्युनिकेशनसाठी आता १९ हजार २६० रुपये शिकवणी शुल्क तर १६४९ रुपये प्रयोगशाळा शुल्क भरावे लागणार आहे.

विशेष म्हणजे, ही केवळ शिकवणी शुल्क आणि प्रयोगशाळा शुल्क असून विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना प्रवेश शुल्क, ग्रंथालय शुल्क, महाविद्यालय विशेषांक शुल्क, व्यायामशाळा शुल्क आणि इतर अनेक प्रकारचे शुल्क भरावे लागते.