नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना १०० कोटींच्या खंडणी मागून बॉम्बस्फोटमध्ये उडविण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार लष्कर ए तोयबा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी सचिव अफसर पाशा याला नागपूर पोलिसांनी बेळगाव कारागृहातून ताब्यात घेतले. त्याला नागपुरात आणले असून त्याची आणि जयेश पुजारी याची समोरासमोर चौकशी करण्यात येणार आहे.
२१ मार्चला गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालात बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याने तीन फोन केले व १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास बॉम्बस्फोटात उडविण्याची धमकी दिली. या प्रकरणात पहिल्यांदा बेळगाव कारागृहातून जयेश पुजारी याला नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर युएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
जयेश हा कुख्यात दहशतवादी अफसर पाशा ऊर्फ बशिरुद्दीन नूर मोहम्मद याच्या संपर्कात होता. अफसर हा २०१२ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबासाठी दहशतवाद्यांची भरती करायचा. तो दोष सिद्ध आरोपी आहे. पुजारीचे अफसरसोबतच्या संपर्काचे काही ठोस पुरावे नागपूर पोलिसांना मिळाले. त्यामुळे अफसरला सहआरोपी करण्यात आले. पाशा याच्याकडून आणखी मोठा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.