नागपूर : जून महिन्याच्या अखेरीस सुरू झालेला पाऊस जुलै महिन्यात बऱ्यापैकी कोसळला. या पावसाने राज्यातील अनेक भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण केली. मात्र, आता ऑगस्ट महिन्यात आणि मुख्यत्वेकरून पहिल्या दोन आठवड्यात पुन्हा एकदा पाऊस सरासरी पेक्षा कमी राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. दोन आठवड्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण हळूहळू वाढेल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी कोकण आणि खानदेशातील काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.

मोसमी पावसाचा हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज गुरुवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिला. यावेळी त्यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाची स्थिती कशी राहील याचा अंदाज व्यक्त केला. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यात सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ऑगस्ट महिन्यात देशात हवामान विभागाने सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असतानाच प्रामुख्याने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी राहणार आहे. तर मराठवाड्यात देखील विदर्भासारखीच परिस्थिती राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी राहणार आहे. अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, पालघर, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात मात्र सरासरी आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.