अमरावती : पंढरीच्या विठ्ठलदर्शनाची आस लागलेल्या भाविकांसाठी चार रेल्वे स्थानकांवरून विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विदर्भातील विठ्ठल भक्तांची सोय होणार आहे. ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. यासाठी अनेक भाविक पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्याच्या तयारीत आहेत. भाविकांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. आषाढीसाठी विदर्भातून नागपूर, नवी अमरावती, अकोला आणि खामगाव येथून या रेल्वेगाड्या सुटणार आहेत.
नागपूर-मिरज ही गाडी ४ आणि ५ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी पंढरपूर, मिरजेच्या दिशेने सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपुरात, तर मिरजेत दुपारी १२ वाजता पोहचेल. यानंतर मिरजेतून दुपारी १ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. ही गाडी सर्व प्रमुख स्थानकांवर थांबेल. अकोला ते मिरज दरम्यान यात्रेकरूंच्या सोयीसाठी रेल्वेकडून आषाढी विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. येत्या ५ जुलै रोजी ०७५०५ क्रमांकाची गाडी सकाळी ११ वाजता अकोला रेल्वे स्थानकावरून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता पंढरपूर आणि ११ वाजता मिरजेत पोहचेल. यानंतर ६ जुलैला ०७५०६ क्रमांकाची गाडी दुपारी २.१५ वाजता मिरज आणि ४.२० वाजता पंढरपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी अकोला येथे पोहचेल. वाशिम, पूर्णा, लातूर मार्गे ही गाडी धावणार आहे.
खामगाव ते पंढरपूर दरम्यान देखील विशेष गाडी धावणार आहे. ३ आणि ७ जुलै रोजी ०११२१ क्रमांकाची गाडी सकाळी ११.३० वाजता खामगाव रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूर येथे पोहचेल. सोबतच ४ आणि ७ जुलै रोजी ०११२२ क्रमांकाची गाडी पंढरपूरहून पहाटे ५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी खामगाव येथे पोहोचणार आहे.
नवी अमरावती-पंढरपूर विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०१११९ नवी अमरावती येथून २ जुलै आणि ५ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पोहोचेल. विशेष रेल्वेगाडी क्रमांक ०११२० पंढरपूर येथून ३ जुलै व ६ जुलै रोजी पंढरपूर येथून सायंकाळी ७.३० वाजता सुटेल आणि नवी अमरावती येथे दुसऱ्या दिवशी १२.५० वाजता पोहोचेल. बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, चाळीसगाव, कुर्डवाडी मार्गे ही गाडी धावणार आहे.