यवतमाळ – निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना रात्रीचे उरलेले अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी गरम करून खाऊ घातले. यातून शाळेतील ५० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. ही घटना पुसद तालुक्यातील हूडी बु. येथील गिरीधर महाराज विजाभज माध्यमिक आश्रमशाळेत शुक्रवारी घडली.
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मान्यताप्राप्त मल्हारराव होळकर प्रतिष्ठान नवीन पुसदद्वारा संचालित श्री गिरीधर महाराज विजाभज माध्यमिक आश्रमशाळा चालविली जाते. येथे चालू शैक्षणिक सत्रात २७५ विद्यार्थी राहतात. यातील अनेक विद्यार्थी विदर्भ, मराठवाडा सीमावर्ती भागातील आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमीप्रमाणे भोजन झाल्यानंतर शाळेत जाण्याची तयारी केली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांना उल्टी व शौचाचा त्रास होण्यासोबतच डोकेदुखी व मळमळ, श्वास घेण्यासही त्रास सुरू झाला.
हेही वाचा – मविआतील घटक पक्षांनी प्रथम त्यांचे पक्ष एकसंघ ठेवावे – फडणवीस
प्रारंभी तीन, चार विद्यार्थ्यांना ही लक्षणे आढळली. नंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांनाही त्रास होत असल्याचे शिक्षकांना सांगितले. त्यानंतर व्यवस्थापनाने या विद्यार्थ्यांना तातडीने पुसद येथील तीन विविध खासगी दवाखान्यात दाखल केले. तीन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती. इतरांवर प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली. या घटनेची माहिती पालकांना होताच पालकांनी शाळेत आणि दवाखान्यात मोठी गर्दी केली. अनेक पालक आपल्या पाल्यास घरी घेऊन गेले. पोलिसांनी घटनेची दखल घेऊन विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविले. या घटनेचा अहवाला ताताडीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.