यवतमाळ : अवकाळी पावसाने आणि सततच्या ढगफुटीने मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले. येथील सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. महाविद्यालयातील १८ विद्यार्थीनी आणि २१ विद्यार्थी अशी एकूण ३९ जणांची स्वयंसेवकांची चमू प्रा. घनश्याम दरणे आणि प्रा. सुहानंद ढोक यांच्या नेतृत्वाखाली लोकांकडून जमा झालेली मदत घेवून मराठवाड्याकडे रवाना झाली. हे स्वयंसेवक मराठवाड्यातील पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.
मराठवाड्यात असंख्य शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, घरांचेही नुकसान झाले. पावसामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत. सोलापूर, बीड, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेकडो एकर शेतजमिनी खरडल्या असून, रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर यवतमाळातून समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी मदत घेऊन रवाना झाले. या पथकाच्या निरोप समारंभास प्रा. डॉ. रमाकांत कोलते, सामाजिक कार्यकर्ते सुरेश राठी, अनंत कौलगीकर, प्रशांत बनगीनवार, प्रा. सरकटे, श्री. मंगेश खुणे, सुवर्णा ठाकरे, प्रा. अरुण शेंडे, शेखर कोलते आदी उपस्थित होते. दिवाळीच्या सुट्टीत घरी जाण्याऐवजी विद्यार्थी आपत्तीग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे आले.
हा विद्यार्थ्यांच्या समाजसेवेचा आणि संवेदनशीलतेचा खरा परिचय आहे. हा अनुभव विद्यार्थ्यांना आयुष्यभर उपयोगी पडेल, असे कौतुकोद्गार मान्यवरांनी काढले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. सीमा शेटे यांनी विद्यार्थीदशेत घेतलेले असे अनुभव समाजातील वास्तव समजून घेण्यास मदत करतात. हेच अनुभव त्यांना संवेदनशील आणि जबाबदार नागरिक बनवतील, असे सांगितले.
मदत पथकाचे काम केवळ तत्काळ मदतीपुरते मर्यादित नसून दीर्घकालीन पुनर्वसन आणि शेती पुनर्बांधणीच्या दृष्टीनेही नियोजनबद्ध आहे. खरीप हंगाम गमावलेल्या आणि रब्बी हंगाम घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक सर्वेक्षण, अभ्यास आणि निधी देणाऱ्या संस्थांकडे प्रस्ताव सादर करण्याचे काम पथक ‘उगम’ संस्था, कळमनुरी यांच्या सहकार्याने करणार आहे.
त्याचबरोबर पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची कारणमीमांसा करून, भविष्यात अशा आपत्ती टाळण्यासाठी शाश्वत उपाययोजनांबाबतचा अभ्यास अहवाल देखील शासनाला सादर केला जाणार आहे, असे प्रा. घनश्याम दरणे यांनी सांगितले.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून यवतमाळकरांनी एकत्र येऊन ‘दिवाळी भेट फॅमिली किट’ स्वरूपात साहित्य दिले आहे. तसेच अनेक नागरिकांनी मदत पथकाच्या खर्चासाठी निधीचे योगदान दिले आहे.