दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री

नागपूर : करोनासह इंधनाच्या वाढीव दरामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)  २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून प्रवासी शुल्कात दरवाढ जाहीर  केली आहे. त्यानुसार आता

जलद व साधारण गाड्यांमधून नागपूरहून पुणे, पंढरपूर जाण्यासाठी १५५ रुपये तर औरंगाबाद जाण्यासाठी १०५ रुपये प्रवाशांना अतिरिक्त मोजावे लागणार आहे. दिवाळीच्या तोंडावर ही दरवाढ झाल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या प्रवाशांच्या खिशाला जास्तच कात्री लागणार आहे.

‘एसटी’कडून पूर्वी नागपूरहून पुणे आणि पंढरपूर या दोन्ही शहरात जाणाऱ्या प्रवाशांकडून जलद व साधारण गाड्यांमधून प्रवासासाठी ९२५ रुपये, निम आरामसाठी १,२५५ रु., शिवशाहीसाठी १,३७० रु. भाडे आकारले जात होते. ते आता वाढून जलद व साधारण बससाठी १,०८० रुपये (१५५ रुपये वाढ), निमआरामसाठी १,४७० रुपये (२१५ रुपये वाढ), शिवशाहीसाठी १,६०५ रुपये (२३५ रु.) आकारले जाणार आहे. नागपूरहून औरंगाबादसाठी पूर्वी जलद व साधारण बससाठी ६३६ रु., निम आरामसाठी ८६० रु., शिवशाहीसाठी ९४० रुपये आकारले जात होते. ते आता वाढून जलद व साधारण बससाठी ७४० रु. (१०५ रु.), निमआरामसाठी १,०१० रु. (१५० रु.), शिवशाहीसाठी १,१०० रु. (१६० रु.) आकारले जाणार आहेत.

नागपूरहून अकोलासाठी पूर्वी जलद व साधारण बससाठी ३१५ रु., निमआरामसाठी ४१५ रु., शिवशाहीसाठी ४६५ रु. आकारले जात होते. ते आता वाढून जलद व साधारण बससाठी ३६५ रु. (५० रु.), निमआरामसाठी ५०० रू. (७५ रू.), शिवशाहीसाठी ५४५ रु. (८० रु.) आकारले जाणार आहे. नागपूरहून अमरावतीसाठी पूर्वी जलद व साधारण बससाठी १९५ रु., निमआरामसाठी २६५ रु., शिवशाहीसाठी २९० रु. आकारले जात होते. ते आता वाढून जलद व साधारण बससाठी २२५ रु. (३० रु.), निमआरामसाठी ३१० रु. (४५ रु.), शिवशाहीसाठी ३३५ रु. (४५ रु.) आकारले जाणार आहे. नागपूरहून सोलापूरसाठी पूर्वी जलद व साधारण बससाठी ९२५ रु., निमआरामसाठी १,२५५ रु., शिवशाहीसाठी १,३६० रु. आकारले जात होते. ते आता वाढून जलद व साधारण बससाठी १,०८० रु. (१५५ रु.), निमआरामसाठी १,४७० रु.(२१५ रु.), शिवशाहीसाठी १,६०५ रु. (२३५ रु.) आकारले जाणार आहेत. नागपूरहून नांदेडसाठी पूर्वी जलद व साधारण बससाठी ४७० रु., निम आरामसाठी ६३५ रु., शिवशाहीसाठी ६९५ रु. आकारले जात होते. ते आता वाढून जलद व साधारण बससाठी ५५० रु. (८० रु.), निम आरामसाठी ७५० रु. (११५ रु.), शिवशाहीसाठी ८१५ रु. (१२० रु.) आकारले जाणार आहे. इतरही शहरासह गावात अंतरानुसार ही दरवाढ आहे.

रातराणीचे भाडे घटले

नागपूरहून पूर्वी रातराणीने पुणे, पंढरपूर या दोन शहरात प्रवास करणाऱ्याला १,०९० रुपये लागत होते. ते आता उलट १० रुपये कमी म्हणजे १,०८० रुपये झाले आहे. औरंगाबादला जाण्यासाठी पूर्वी ७५० रुपये लागत होते. ते आता १० रुपये कमी म्हणजे ७४० रुपये झाले आहे. अकोलासाठी पूर्वी ३७० रुपये लागत होते. ते आता ३६५ रुपये झाले आहे. अमरावतीसाठी पूर्वी २३० रुपये लागत होते. ते आता २२५ रुपये झाले आहे. सोलापूरसाठी पूर्वी ९३५ रुपये लागत होते. ते आता ९२५ रुपये झाले आहे. इतरही शहरात कमी अधिक हे दर कमी झाले आहेत.

प्रथम करोना व त्यानंतर इंधनाचे दर वाढल्याने एसटी आर्थिक अडचणीत आहे. त्यातच १६ जून २०१८ मध्ये एसटीला डिझेल ७२ रुपये लिटर मिळत होते. ते आता १०२ रुपये लिटरच्या जवळपास दराने घ्यावे लागत आहे. त्यानंतरही एसटीने प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून फार कमी दरवाढ केली आहे. तर रातराणीचे दर उलट कमी केले आहे. – नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक (नागपूर), एसटी महामंडळ.