लोकसत्ता टीम

नागपूर: महावितरणच्या भरारी पथकाने रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिलमध्ये १ कोटी २ लाख २३ हजार ८४९ रुपयांची वीज चोरी पकडली.

महावितरणच्या नागपूर शहर भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे हे ३० डिसेंबरला दुपारी ४.४५ वाजताच्या चमूसह देवलापार येथील ताज राईस मिलचा वीजपुरवठा व संच तपासणी करण्याकरिता गेले होते. येथे थ्री फेजच्या औद्योगिक वीजमीटरला आणि मीटर टर्मिनल कव्हरला सुद्धा सील नव्हते. ही राईस मिल पूर्ण क्षमतेने सुरु असतांनाही मीटरमध्ये कमी वापर दिसत होता. त्यामुळे सर्विस केबलची तपासणी करण्यात आली. ट्रान्सफॉर्मरच्या वितरण बाक्सच्या जागी करंट मोजले असता वापराप्रमाणे करंट दिसत होता. सर्विस केबलला दोन ठिकाणी जोड आढळून आले. त्यात केबल व मीटरच्या डिस्प्लेमध्ये तफावत दिसून आली. त्यामुळे वीजमिटरला जोडणाऱ्या केबलची तपासणी करण्यात आली असता इनकमिंग सर्विस केबलला अतिरिक्त केबल जोडल्याचे निदर्शनास आले व या केबलद्वारे संपूर्ण राईस मिलला वीजपुरवठा चालू असल्याचे निदर्शनास आले. अतिरिक्त जोडलेल्या केबलवर देखील वीज वापराची नोंद मीटरमध्ये होत नव्हती.

आणखी वाचा-नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व प्रकाराची योग्य शहानिशा करून ग्राहकाने अवैधरित्या वीज पुरवठा घेत मागील १२ महिन्यात ४ लाख ९० हजार ३२ युनिटचा अवैध वापर करून रूपये १ कोटी २ लाख २३ हजार ८९४ चे महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याचे निदर्शनास आले. संपूर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. या प्रकरणी ताज राईस मिलचे शफ़िक रीर अंसारी याचेविरोधात रामटेक पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तडजोडीची रक्कम म्हणून १३ लाख १० हजाराचा दंड असा एकूण १ कोटी १५ लाख ३३ हजार ८९४ रुपयाचे देयके आकारण्यात आले आहे. सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागा अंतर्गत कार्यरत नागपूर शहर भरारी पथकाने विदर्भातील आजवरची ही सर्वात मोठि वीज चोरी उघडकीस आणली आहे.