यवतमाळ: यवतमाळकरांची गेल्या १५ वर्षांची प्रतीक्षा अखेर बुधवारी संपली. वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किमी रेल्वेमार्गावरील कळंब ते वर्धा या पहिल्या टप्याळततील रेल्वेसेवेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ झाले आणि यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात नागरिकांनी आनंद व्यक्त केला.या रेल्वे सेवा या प्रदेशातील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. याचा फायदा प्रवासी, व्यवसायिक आणि स्थानिक समुदायांना होईल, असे मत या रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कळंबपासून तीन किमी अंतरावरील कामठवाडा येथे नवीन असे सुसज्ज रेल्वेस्थानक उभारण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खा.रामदास तडस यांच्यासह शेकडो नागरिकांच्या उपस्थितील कळंबहून पहिली रेल्वे वर्धेकडे रवाना झाली. यावेळी उपस्थितांनी प्रचंड जल्लोश केला. ही गाडी ताशी ७० किमी वेगाने धावली. देवळी येथेही गाडीचे उत्फूडयर्त स्वागत करण्यात आले. वर्धा ते कळंब गाडी क्रमांक ५१११९ तर कळंब ते वर्धा गाडी क्रमांक ५११२० ही या मार्गावर रविवार व बुधवार वगळता उर्वरित पाचही दिवस धावणार आहे. या गाड्यांना देवळी आणि भिडी स्थानकावर नियोजित थांबे असतील. कळंब ते वर्धा हे ३९ किमीचे अंतर ही गाडी ताशी ४० किमी वेगाने एक तासात कापणार आहे.
हेही वाचा >>>आजी-माजी आमदारांचा इंटक नेत्यांवरील अब्रुनुकसानीचा दावा…नेमकं प्रकरण काय?
वर्धा-यवतमाळ-नांदेड या २७० किमी रेल्वे मार्गाकरीता केंद्राच्या अर्थसंकल्पात नुकतीच ७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या कळंब-यवतमाळ-दारव्हा या मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या रेल्वेमुळे विदर्भ-मराठवाड्यातील दळणवळणाची गती वाढणार आहे. नागपूरहून थेट नांदेड येथे जाण्यासाठी रेल्वे सुविधा मिळण्यासोबतच यवतमाळची उत्त्र, दक्षिण अशी कनेक्टिव्हीटी होणार आहे. या रेल्वेमार्गामुळे यवतमाळ जिल्ह्यात उद्योग, व्यवसायांना चालना मिळणार आहे. दुसऱ्या टप्याळचत कळंब-यवतमाळ हा मार्ग पूर्ण होताच नागपूर-वर्धा-यवतमाळ अशी रेल्वे सुरू होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. यवतमाळहून दररोज हजारो नागरिक नागपूरला ये-जा करतात. रेल्वे सुविधा सुरू झाल्यास नागरिकांची मोठी सोय होणार आहे. रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यावर नागपूर-यवतमाळ ही ब्रॉडगेज मेट्रोसेवा सुरू करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
आजपर्यंत दळणवळणाच्या सुविधांत मागे असलेला यवतमाळ जिल्हा नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ३६१, शक्तीपीठ महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वमुळे विकासाच्या मार्गावर येण्याची चिन्ह आहेत.