लोकसत्ता टीम

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न सोडवताना सर्वाधिक खोडा घालणारा वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’ असून त्यांना घेराव घातला पाहिजे. असा चिमटा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढला. ते गडचिरोली-चिमूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी देसाईगंज येथे आयोजित सभेत बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की , मागासलेपण आणि गरिबी दूर करून विकास करायचा असेल तर आधी मूलभूत प्रश्नावर विचार करावा लागतो. ते प्रश्न आधी सोडवावे लागतात. गडचिरोली जिल्ह्याच्या संदर्भात आम्ही हीच बाब डोक्यात ठेऊन काम सुरू केले. येथील रस्त्यांचा गंभीर प्रश्न सोडवून ३२०० कोटी रुपयांची कामे मंजूर केली. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. पण हे करताना सर्वाधिक खोडा वनविगाने घातला असून ते झारीतील शुक्राचार्य असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.

आणखी वाचा-उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान

पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत मी पण गंभीर आहे. त्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून झाडांचे स्थलांतर हा पर्याय असू शकतो. पण सरसकट विकास कामांना अडथळा निर्माण करणे योग्य नाही. भविष्यात होऊ घातलेल्या लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली सर्वात समृध्द जिल्हा म्हणून ओळखला जाईल. त्यासाठी पोषक असे वातावरण निर्माण करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यामुळे येथील प्रत्येक आदिवासी युवकांच्या हाताला काम मिळेल. त्यांच्या घरात समृध्दी येईल. गडचिरोली ते नागपूर मार्गाची पूर्वी अवस्था बिकट होती. त्यामुळे चार तास लागायचे, आता दोन तासात अंतर पूर्ण होतो. लवकरच नागपूर ते देसाईगंज मेट्रो सुरू होणार आहे. त्यामुळे हा प्रवास पुन्हा कमी होऊन सव्वा तासावर येईल. तेही एसटी पेक्षा कमी भाड्यात. ६० वर्षात काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जे केले नाही. ते आम्ही दहा वर्षात करून दाखवले. येणाऱ्या दहा वर्षात जिल्ह्याची संपूर्ण ओळखच बदलून जाईल. पण त्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्यावे लागेल. असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. मंचावर राज्याचे अन्न व औषध प्राशन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीतील महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

आणखी वाचा-नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी, कोण म्हणाले असे वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींचा उल्लेख टाळला!

नितीन गडकरी यांनी सभेला संबोधित करताना गडचिरोलीत केलेली विकासकामे आणि प्रस्तावित कामांचा धडाच वाचून दाखवला. यावेळी त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांना चिमटे देखील काढले. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत महायुतीतील सर्व नेत्यांच्या भाषणाची सुरवात आणि शेवट मोदींच्या नावाने होत आहे. पण गडकरींनी आजच्या आपल्या संपूर्ण भाषणात मोदींच्या नावाचा केवळ एकदाच ओझरता उल्लेख केला. त्यामुळे सभास्थळी याविषयी चर्चा रंगली होती. हे विशेष.