नागपूर : दरवर्षी नागपूरमध्ये होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे वैदर्भीय विशेषत: नागपूरकरांसाठी एक उत्सवच असतो. उत्सव या अर्थाने की या निमित्ताने संपूर्ण सरकार नागपूरमध्ये तब्बल दोन आठवडे मुक्कामी असते. मुख्यमंत्री, त्यांचे संपूर्ण मंत्रीमंडळ ठाण मांडून असते. सरकारच यणार म्हंटल्यावर त्यांच्या सरबराईसाठी सरकारी यंत्रणा हलणारच. या सरकारी पाहुण्यांच्या सरबराईसाठी मोठी तयारी केली जाते. नागपूरमध्ये सध्या हेच सुरू आहे.

राज्यात महायुतला प्रचंड बहुमत मिळाल्यावरही त्यांना मागील चार दिवसांपासून मुख्यमंत्री ठरवता आला नाही. दिल्ली-मुंबईत बैठकांवर बैठका सुरू आहेत. रुसवे फुगवे दूर केले जात आहे. मात्र मुख्यमंत्री काही ठरत नाही. नागपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी आणून ठेवलेले पुष्पगुच्छ, हार सुकू लागले आहेत. गुलाल तसाच पडून आहे. बँड पथकाला दिलेले निम्मे पैसेही त्यांच्याच कडे आहे. पण मुख्यमंत्री काही ठरत नाही. हे सर्व सांगण्याच्या मागे अर्थ हा आहे की त्याचा थेट संबंध विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाशी आहे. या सर्व धावपळीतही नागपुरात अधिवेशनाच्या तयारीने गती घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे बंगले यांची देखभाल दुरुस्ती सुरू झाली आहे. ज्या भागात अधिवेशन होणार आहे त्या सिव्हील लाईन्सकडे जाणारे सर्व रस्ते गुळगुळीत केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पावसाळ्यात खड्ड्यातून मार्ग शोधला पण सरकारी पाहुण्यांना कोणताही धक्का लागू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. मंत्रीच नव्हे तर सचिवदर्जाच्या अधिकाऱ्यांचेही लाड पुरवण्याची परंपरा हिवाळी अधिवेशनात आहे. हे सर्व पाहुणे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात नागपुरात दाखल होणार आहे. त्यांच्या सरबराईसाठी सध्या यंत्रणा काम करीत आहे.

हेही वाचा…खळबळजनक! मोठ्या भावाच्या बायकोशी जुळले सूत, कुऱ्हाडीने…

सभागृहात आणि बाहेरही हायटेक

तयारी गतीने सुरू आहे. सभागृहात सदस्यांसाठी टॅब लावण्यासह त्यांची भाषणे स्वंयचलितपणे मुद्रित स्वरुपात नोंदवणारी यंत्रणा लावण्यात येणार आहे. विधानभवनाबाहेर तब्बल ६५ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी विविध खात्यांची बैठक घेऊन आठ दिवसात सर्व देखभाल दुरुस्ती व अन्य कामे पूर्ण करावीत, असे आदेश दिले होते. विधिमंडळ सचिवालयाने गुरुवारी विधानभवन परिसरात भाडेतत्वावर ६५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी निविदा काढल्या. अधिवेशन काळात प्रवेशपत्राशिवाय विधानभवनात प्रवेश दिला जात नसला तरीही प्रवेशपत्र मोठ्या प्रमाणात वाटले जात असल्याने परिसरात गर्दी होते. आतमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यावर लक्ष ठेवले जाते.

हेही वाचा…‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधात्मक लसीबाबत डॉक्टरांमध्येही भीती…आरोग्य विभाग…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभागृहाच्या आतमधील यंत्रणा अद्ययावत करण्यात येत आहे. प्रत्येक सदस्याच्या आसनापुढे टॅब लावण्यात आला आहे. सभागृहातील सदस्यांचे भाषण लघुलेखकांच्या माध्यमातून नोंदवले जाते. ही व्यवस्था आता अद्ययावत करण्यात येणार आहे. मुंबईत अशा प्रकारची व्यवस्था आहे. नागपुरात या अधिवेशनापासून ती कार्यान्वित केली जात आहे.