यवतमाळ – नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या चिमुकलीच्या अंगावरून ट्रॅक्टरची ट्रॉली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पुसद तालुक्यातील वनवारला येथे पुस नदीपात्रात घडली. शिवानी सुरेश पवार (९) रा. वनवारला असे मृत चिमुकलीचे नाव आहे. ही गुरूवारी नेहमीप्रमाणे कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. यावेळी नदीवर वाळू उपसा करण्यासाठी आलेला ट्रॅक्टर उभा होता. शिवानी त्याच ठिकाणी कपडे धूत असताना चालकाने ट्रॅक्टर मागे घेतला. शिवानीच्या अंगावरून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने भयभीत झालेला ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला. हा चालक विनापरवाना वाळू उपसा करण्यासाठी आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच शिवानीचे कुटुंबिय व गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरने मुलीचा बळी घेतल्याने नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली. पुढील तपास पुसद ग्रामीण पोलीस करत आहे.
नदीतील वाळू उपसा ठरतोय जीवघेणा
जिल्ह्यातील सर्वच लहान, मोठ्या नद्यांची पात्र वाळू माफियांनी रेती उपस्यासाठी पोखरून ठेवली आहे. गेल्या महिनाभरातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी आर्णी तालुक्यात अरूणावती नदीत लागोपाठ दोन बालकांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. तर याच तालुक्यात कवठा बाजारह येथे नदीत रेती उपस्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात बुडून एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाला होता.
आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेड्यावरील वेदिका चव्हाण या १२ वर्षाच्या मुलीचा नदीवर पाणी आणण्यासाठी गेली असताना बुडून मृत्यू झाला. ही १३ एप्रिल रोजी घडली. त्यानंतर १४ एप्रिल रोजी आर्णी नजीक महाळूंगी पॉईंट येथील भिक्षेकरी कुटुंबातील ताजुब हिफाजत शाहा (८, मूळ रा. सिंधी रेल्वे, जि. वर्धा) या बालकाचा बुडून मृत्यू झाला होता. तर आर्णी तालुक्यातील पैनगंगा नदीत रेती उपसा केलेल्या खड्ड्यात बुडून वर्षभरापूर्वी प्रतीक्षा प्रवणी चौधरी या महिलेसह अक्षरा नीलेश चौधरी व आराध्या नीलेश चौधरी या दोन लहान बहिणींचा बुडून मृत्यू झाला होता. अगणित वाळू उपस्यामुळे नद्या जीवघेण्या ठरत आहे. नदीत ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे निर्माण झाल्याने पाण्याचा अंदाज येत नसल्याने या दुर्घटना घडत असल्याचे सांगितले जाते. याकडे प्रशासनाचे दुलर्क्ष होत असल्याने अशा दुर्घटना सातत्याने घडत आहे.