चारुशीला कुलकर्णी, लोकसत्ता
नाशिक : आर्थिक, शैक्षणिक आणि तत्सम पातळीवर सुरू असणारी करोनाच्या प्रादुर्भावाच्या परिणामांची शृंखला अनाथ बालकांना पालक मिळण्यापासून लांबणीवर टाकणारी ठरण्याच्या मार्गावर आहे. या काळात होऊ घातलेले अनाथ बालकांचे दत्तकविधान अडचणीत सापडले आहे. देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर प्रवासासंबंधी घातलेल्या र्निबधाचा परिणाम दत्तक विधान प्रक्रियेवर जाणवत आहे. अकस्मात उद्भवलेल्या करोना संकटामुळे अनाथ बालक, पालक यासह सामाजिक संस्था कात्रीत सापडल्या आहेत.
अनाथ बालकांना बाल कल्याण समितीच्या माध्यमातून शिशुगृहात दाखल करण्यात येते. या बालकांना त्यांचे कायदेशीर पालक मिळावे यासाठी शिशुगृह-सामाजिक संस्थांकडून दत्तक विधान प्रक्रिया पार पाडली जाते. केंद्र शासनाच्या मदतीने ही प्रक्रिया सध्या ‘कारा’ अर्थात ‘सेंट्रल अॅडोप्शन रिसोर्स अॅथोरिटी’च्या माध्यमातून पार पाडली जाते. राज्यात ५६ संस्थांच्या सहकार्याने ‘कारा’ हे काम करत आहे. या अंतर्गत जिल्हा, राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर बालकांना दत्तक घेण्यासाठी पालक पुढे येतात. महिनाभरापासून या प्रक्रियेवर ‘करोना’चे सावट आहे. दत्तकविधान प्रक्रियेसाठी पालकाने ‘कारा’च्या संकेतस्थळावरून अर्ज केल्यानंतर त्यांना दत्तक बालकाची माहिती दिली जाते. संबंधित संस्था, पालक, बालकाची माहिती मिळाल्यानंतर त्या संस्थेत दाखल होतात. दत्तक समितीसमोर मुलाखत झाल्यानंतर बालकाला २० दिवसांच्या आत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पालक घरी घेऊन जाऊ शकतात. मात्र या प्रक्रियेला आता करोनामुळे अडथळा निर्माण झाला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बालगृहाच्या माध्यमातून या बालकांचा बाहेरील व्यक्तींशी थेट संपर्क येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. सुरक्षेचे उपाय अवलंबले जात आहे. या अंतर्गत अनेक बालगृहांनी दत्तक जाणाऱ्या बालकांच्या पालकांसोबत बैठका रद्द केल्याने ही सर्व प्रक्रिया लांबली आहे. याविषयी येथील आधाराश्रमाचे दत्तक समन्वयक राहुल जाधव यांनी माहिती दिली.
या प्रक्रियेंतर्गत चार वर्षांत ४० हून अधिक बालके दत्तक गेली आहेत. मार्चमध्ये सांगली आणि हैदराबाद येथून पालक बाळ दत्तक घेण्यासाठी येणार होते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी होणारी बैठक रद्द केली आहे. या सर्वाचा परिणाम दत्तक विधान प्रक्रियेवर होणार आहे. शिवाय कायदेशीर प्रक्रियेनुसार बालक २० दिवसांच्या आत कायदेशीर पालकांच्या घरी जाणे गरजेचे आहे. मात्र काही ठिकाणी ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया स्थगित केल्याने ते बाळ दुसरीकडे दत्तक जाईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त होत असल्याचे जाधव यांनी लक्ष वेधले.
स्नेहांकुरचा बाल विभाग वेगळा आहे. प्रशासकीय कामे नियमित सुरू असून बालकांचा बाहेरच्या लोकांशी संपर्क पूर्णत: बंद करण्यात आला आहे. मार्चमध्ये चार बालकांचे दत्तक विधान होणार आहे. त्या संदर्भात पालकांशी चर्चा सुरू असून त्यांना माहिती दिली जात आहे. संस्था पातळीवरून बाहेरून येणाऱ्या लोकांना मास्क, सॅनिटायझर आणि हात धुणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमित कामावर याचा परिणाम नाही. मात्र पालक आणि बालकांची परिस्थिती पाहून दत्तक प्रक्रिया स्थगित करावी की नाही, हे वेळेवर ठरेल.
-प्राजक्ता कुलकर्णी (स्नेहांकुर, व्यवस्थापक, अहमदनगर)
करोनाच्या पार्श्वभूमीवर दत्तक जाणाऱ्या बालकांच्या पालकांसोबत असलेल्या बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. कारण, दत्तक जाणारी बालके देशासह परदेशातही जाणार आहेत. तेथील पालकांना असलेला जंतुसंसर्ग बालकाला तसेच संस्थेतील इतर बालकांना होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. प्रक्रिया लांबणार असून याचा कामकाजावर परिणाम होईल. सुरक्षेच्या दृष्टीने या उपाययोजना आवश्यक आहेत. संस्थेत गर्दी टाळली जात आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना होत असताना महिनाभर पुरतील अशी औषधे, अन्नधान्य याचा साठा केला जात आहे. – सुनील अरोरा (बाल आशा ट्रस्ट, मुंबई)