24 February 2019

News Flash

एसटी संपामुळे प्रवाशांचे हाल

महामंडळाच्या वेगवेगळ्या कामगार संघटना असून संप कोणी पुकारला, याबाबत कामगारांमध्ये संभ्रम आहे.

एसटी संपामुळे नाशिक येथील नवीन सीबीएस बस स्थानकात प्रवाशांची झालेली गर्दी.

काही मार्गावर बस फेऱ्या सुरू

सातवा वेतन आयोग लागू करा, पदनिहाय वेतनश्रेणी द्या, जोपर्यंत कामगार-कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना २५ टक्के हंगामी वाढ द्यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी मध्यरात्रीपासून एस.टी. कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. संपास जिल्ह्य़ात संमिश्र प्रतिसाद लाभला. पूर्वसूचना न देता सुरू झालेल्या या संपामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. आपल्या मूळ गावी परतण्यासाठी आलेल्या प्रवाशांना काही ठिकाणी माघारी परतावे लागले. जिल्ह्य़ात संपादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. संपस्थिती कायम राहिल्यास प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा आधार घेतला जाईल, असा इशारा राज्य परिवहन महामंडळाने दिला आहे. दुसरीकडे, संपाची संधी साधत खासगी वाहतूकदारांनी दरामध्ये लक्षणीय वाढ केल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

महामंडळाच्या वेगवेगळ्या कामगार संघटना असून संप कोणी पुकारला, याबाबत कामगारांमध्ये संभ्रम आहे. संपात काहींनी सहभाग घेतला, तर काही जण नियमितपणे कामावर रुजू झाले. संपासंदर्भात संघटनांच्या वतीने शुक्रवारी रात्री सूचना देण्यात आली. यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ा जवळच्या आगारात रात्री मुक्कामी थांबल्या. आगारातील वाहनांना सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही प्रवास पुढे चालू ठेवा, प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवा, अशी सूचना आगारांकडून करण्यात आली. परंतु काही संपकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. काही वाहन चालक-वाहक पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले. शुक्रवारी पहाटे पाचपासून वापी, शिर्डी, सूरत या तीन बसेस स्थानिक पातळीवर सोडण्यात आल्या. नाशिक-शिर्डी फेऱ्या सुरू असून रात्री मुक्कामी असलेल्या ५० गाडय़ा मार्गस्थ झाल्याचे मुंबई नाका स्थानक आगाराकडून सांगण्यात आले. ठक्कर बाजार येथील नवीन बस स्थानकातून खान्देश भागात लांब पल्ल्याच्या ५८ गाडय़ा सोडण्यात आल्या. याव्यतिरिक्त रात्री मुक्कामी असलेल्या २३ रातराणी सोडण्यात आल्या. विनावाहक धुळे शिवशाही तसेच निमआराम बसेस यासह मालेगाव आणि अन्य मार्गावरील वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती. नाशिक-पुणे शिवशाही धावली नसल्याचे आगारप्रमुखांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील १३ आगारांतून होणाऱ्या दोन हजार ३८३ फेऱ्यांपैकी केवळ ५६२ फेऱ्या झाल्याने महामंडळाचे कोटय़वधींचे व्यवहार ठप्प झाले. उन्हाळी सुट्टी संपत आल्याने अनेक जण आपल्या मूळ गावी परतू लागले आहेत. यामुळे बसस्थानके पुन्हा गर्दीने ओसंडून वाहू लागली असतानाच अचानक पुकारलेल्या संपाचा फटका प्रवाशांना बसला. निम्म्या प्रवासातच उतरविल्याने प्रवाशांनी आगारप्रमुखांकडे नाराजी व्यक्त केली. मात्र कर्मचारी ऐकत नसल्याने त्यांनीही आपली हतबलता व्यक्त केली. स्थानिक पातळीवर सिन्नर, त्र्यंबक अशा बसेस सुरू असल्या तरी त्यांच्या फेऱ्यांचे प्रमाण नगण्य होते.

खासगी प्रवासी वाहतूकदारांची दरवाढ

अचानक पुकारलेल्या संपाचा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी फायदा घेतला. शहरापासून अवघ्या २० ते ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सिन्नर, त्र्यंबक येथे जाण्यासाठी प्रती व्यक्ती १०० ते १५०, कसाऱ्यासाठी २५० ते ३००, शिर्डीसाठी ५०० अशी दुप्पट, तिप्पट दरवाढ करत प्रवाशांची पिळवणूक करण्यात आली. आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेसला कुठल्याही प्रकारची अडवणूक होऊ नये यासाठी आगाराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

भागाबाई महाले या महिला प्रवासी म्हणाल्या, आम्ही कोपरगावला राहतो. संपाची माहिती नव्हती. सकाळपासून कुठलीतरी बस सिन्नर किंवा वावीपर्यंत सोडेल, तेथून नातेवाईकांना बोलावून मूळ गावी परत जाण्याचे ठरविले होते. संपामुळे नाहक मनस्ताप सोसावा लागला. शांताराम थिटे यांना कामानिमित्त दुपारी मुंबईला जायचे होते. यासाठी कसारा बस कधी याची चौकशी करण्यासाठी ते आले, तर कोणतीही बस धावणार नसल्याची माहिती आगार प्रमुखांकडून त्यांना देण्यात आली. खासगी वाहनचालकाने कसाऱ्यासाठी ५०० रुपये मागितले. महामंडळाची निम्म्या तिकिटाची सवलत असताना खासगी वाहनाने का जाऊ, असा प्रश्नही थिटे यांनी उपस्थित केला. मूळ उत्तर प्रदेशातील गया येथे राहणारा संदीप शर्मा त्र्यंबक दर्शनासाठी नाशिकला आला. धार्मिक विधी आटपून त्याला सूरत गाठायचे आहे. संपामुळे त्याचीही गैरसोय झाली. खासगी वाहनाचा दर परवडण्यासारखा नाही आणि रेल्वेचे वेळापत्रक माहिती नसल्याने बस स्थानकावरच संप मिटण्याची वाट पाहावी लागेल, अशी हतबलता त्याने व्यक्त केली.

First Published on June 9, 2018 1:28 am

Web Title: msrtc workers strike nashik