नाशिक : गावातील ६० शिधापत्रिका काढून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागून १४ हजार रुपये स्वीकारल्याच्या प्रकरणात इगतपुरीतील पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि खासगी व्यक्ती यांच्याविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. दुसऱ्या प्रकरणात देयक मंजूर करण्यासाठी एक लाख ७० हजाराची लाच मागितल्या प्रकरणी इगतपुरी नगरपालिकेतील सफाई कामगार, संगणक अभियंता आणि लेखापाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
तक्रारदाराच्या गावात ६० शिधापत्रिका काढायच्या होत्या. या अनुषंगाने ते इगतपुरी पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षण अधिकारी ललित पाटील आणि गोसावी यांना भेटले होते. त्यांनी खासगी व्यक्ती सोमनाथ टोचे याच्यासमोर प्रत्येक शिधापत्रिकेसाठी ५०० रुपये यानुसार दर ठरवला. चार हजार रुपये स्वीकारून उर्वरित २६ हजार रुपयांची मागणी केली. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तेव्हा खासगी व्यक्ती टोचे आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी पाटील यांनी २६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यातील १० हजार रुपये टोचे याच्यामार्फत स्वीकारल्यावर पथकाने रंगेहात पकडले. पाटील आणि टोचे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात” आहे. संशयितांच्या झडतीत भ्रमणध्वनी आढळले. सापळा अधिकारी म्हणून राजेंद्र सानप यांनी काम पाहिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नगरपालिकेतील तिघे सापळ्यात
इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविणे, संगणक, प्रिंटर पुरविणे व देखभाल दुरुस्तीच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी स्वत:सह मुख्याधिकाऱ्यांसाठी सर्वांचे मिळून २७ टक्के याप्रमाणे एक लाख ७० हजार रुपये मागितल्या प्रकरणी नगरपालिकेतील सफाई कामगार नितीन लोखंडे, संगणक अभियंता सूरज पाटील आणि लेखापाल सोमनाथ बोराडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४३ वर्षीय तक्रारदाराने इगतपुरी नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसविण्याचे काम केले आहे. नगरपालिकेला संगणक, प्रिंटर पुरविणे व त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्यांच्याकडे होते.
या कामाचे देयक मंजूर करण्याच्या मोबदल्यात संशयितांनी सर्वांचे मिळून २७ टक्के प्रमाणे एक लाख ९० हजारापैकी एक लाख ७० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या पडताळणीत संशयितांनी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे उघड झाले. यावरून तिघांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी काम पाहिले.