कृषिमंत्री दादा भुसे यांचा शेतकऱ्यांना सल्ला

नाशिक : शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेवून पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट टाळण्यास मदत होईल. निसर्गाचा लहरीपणा नेहमीचा असून किमान ८० ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी के ले आहे. जिल्ह्य़ात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. शेतकरी पेरणीसाठी घाई करत असल्याचे लक्षात घेऊन भुसे यांनी उगवण क्षमतेला आवश्यक असलेली पुरेशी ओल लक्षात घेवूनच शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात करावी, असेही भुसे यांनी सांगितले.

श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन योजना, जनसुविधा आणि २५१५ योजनेतंर्गत मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन भुसे

यांच्या हस्ते मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथे झाले. यामध्ये दाभाडी, ढवळेश्वर, पिंपळगाव, बेळगांव, तळवाडे व जळगाव (गाळणे) येथील भूमिगत गटार, प्रखर दिवे, पानंद रस्ते, पाण्याची टाकी, रस्ता कॉक्रिटीकरण, समाज मंदीर, चौक सुशोभिकरण, पेव्हर ब्लॉक, शवपेटी, शाळांच्या वर्ग खोल्या दुरुस्ती, बाजार तळ बांधणे, अंगणवाडी बांधणे, स्मशानभुमी, व्यायामशाळा व साहित्य, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, शौचालय युनिट, क्रीडांगण आदींचा समावेश आहे. यावेळी भुसे बोलत होते.

आदर्शगाव म्हणून नावलौकीक मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्नशिल राहून राष्ट्रीय रुरबन योजनेतंर्गत होणारे प्रत्येक काम दर्जेदार होण्याची जबाबदारी पदाधिकारी व ग्रामस्थांनी चोखपणे पार पाडावी. प्रत्येक गावाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी शासन कटिबध्द असून राष्ट्रीय रुरबन योजनेतंर्गत होणाऱ्या कामात त्रुटी आढळून आल्यास ते काम थांबविण्याचा अधिकार ग्रामस्थांना असल्याचेही भुसे म्हणाले.

मालेगाव तालुक्यात एकाच वेळी पाच कृषी महाविद्यालयांना मंजुरी मिळून ६५० एकर क्षेत्रावर साकारण्यात येणाऱ्या महाविद्यालयामुळे तालुक्याच्या सर्वागिण विकासाला चालना मिळेल. याशिवाय अजंग-रावळगाव येथील एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून व्यावसायिकांना देखील मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी केवळ एक पानी अर्ज  एकाच वेळी सादर करून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभही लाभार्थ्यांंना देण्यात येत असल्याचे भुसे यांनी नमूद के ले.

यावेळी दाभाडीच्या सरपंच सोनाली निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहूल पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश निकम, प्रमोद निकम, निळकंठ निकम, निरंकार निकम, डॉ. एस. के. पाटील, भावना निकम यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.