नाशिक : विभागात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विभागातील शहरी आणि ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या ३६ लाख ४६ हजार ३६३ असून, या प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत ३६ लाख चार हजार ९९४ इतके राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली आहे. नाशिक जिल्ह्यात १० लाख राष्ट्रध्वजांचे वितरण झाले आहे.

नाशिक जिल्ह्यासाठी महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात चार लाख २५ हजार २४० घरांची संख्या असून, ग्रामीण भागातील घरांची संख्या पाच लाख ७४ हजार ७६० इतकी असून, तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर सात लाख राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून तीन लाख राष्ट्रध्वज पुरविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक महापालिकेला दोन लाख, तर मालेगाव महापालिकेला एक लाख राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले आहेत. टपाल कार्यालयामार्फत राष्ट्रध्वज उपलब्ध करण्यात आले होते. सुमारे २५ हजार राष्ट्रध्वज नागरिकांनी खरेदी केले. आता टपाल कार्यालयात ते मिळेनासे झाले आहेत. जळगाव महापालिका व जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात घरांची संख्या दोन लाख ८५ हजार २३५ तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या सहा लाख ८० हजार १५६ आहे. जिल्हास्तरावर सात लाख ६५ हजार ७२७ राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एक लाख ९९ हजार ६६४ लाख राष्ट्रध्वजांपैकी एक लाख ७५ हजार राष्ट्रध्वज वितरित केले आहेत. धुळे महापालिका व जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात घरांची संख्या एक लाख आठ हजार ९१४ तर ग्रामीण भागातील घरांची संख्या दोन लाख ९३ हजार २०५ असून, तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर दोन लाख ७३ हजार ५०३ राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एक लाख २८ हजार ६१६ राष्ट्रध्वजांपैकी एक लाख दहा हजार राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले आहेत.

नंदुरबार पालिका क्षेत्रात घरांची संख्या ४६ हजार २८४ तर ग्रामीण भागातील घरांची संख्या तीन लाख ३२ हजार ९०३ आहे. जिल्हास्तरावर तीन लाख ६० हजार १८७ राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून १९ हजार राष्ट्रध्वज पुरविण्याची मागणी होती. २० हजार राष्ट्रध्वज वितरित करण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये नऊ लाखांहून अधिक राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात आले आहे. अहमदनगर महापालिका व जिल्ह्यातील पालिका क्षेत्रात घरांची संख्या एक लाख ९६ हजार ९०५ तर ग्रामीण भागातील घरांची संख्या सात लाख दोन हजार ७६१ असून तितकेच राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहेत. जिल्हास्तरावर सात लाख ८० हजार ५७७ राष्ट्रध्वज उपलब्ध झाले असून, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून एक लाख १९ हजार ८९ राष्ट्रध्वज पुरविण्याची मागणी होती; परंतु एक लाख २० हजार राष्ट्रध्वज पुरविण्यात आले आहेत.

चोवीस तास तिरंगा फडकणार
भारतीय ध्वजसंहितेमध्ये एका आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलिस्टर व यंत्राद्वारे तयार करण्यात आलेले राष्ट्रध्वज घरावर लावण्यास परवानगी देण्यात आली आहे, तसेच या अभियानात घरावर राष्ट्रध्वज फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र चोवीस तास फडकविण्यात येणार आहे.