जळगाव – मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा जीआर काढला आहे. परंतु, त्यानंतरही मराठा-ओबीसी यांच्यातील वाद थांबू शकलेला नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सरकारनेच मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडणे लावली आहेत, असा खळबळजनक आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी येथे केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाची सांगता झाल्यानंतर राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून निर्माण झालेला वाद कमी होण्याऐवजी उलट आणखी उफाळून आल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये येत्या सोमवारी आयोजित मोर्चाच्या अनुषंगाने जळगावात गुरूवारी शरद पवार गटाचा मेळावा घेण्यात आला. त्या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खडसे यांनी महायुती सरकारच्या तरूणांसह शेतकरी विरोधी धोरणांवर देखील जोरदार टीका केली.
मराठा-ओबीसी यांच्यात आरक्षणावरून वाद सुरू असतानाच आता बंजारा, धनगर तसेच लिंगायत समाज आरक्षण मागण्यास पुढे आला आहे. एकापेक्षा जास्त समाजांमध्ये भांडणे लावण्याचे काम सरकारनेच केले आहे. इतके दिवस गुण्यागोविंदाने नांदणारे समाज एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहु लागले आहेत, असेही खडसे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा जीआर काढला आहे. मात्र, त्या माध्यमातून सर्वच मराठ्यांना ओबीसीचे आरक्षण मिळते की नाही, त्याबद्दल शंका आपल्याला शंका आहे.
जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी वर्षानुवर्षांपासून आंदोलन सुरू आहे. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुढाकार घेऊन एकदा जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबवले होते. प्रत्यक्षात, नुसत्या घोषणा करणाऱ्या सरकारने आतापर्यंत एकदाही आपल्या निर्णयाची अमलबजावणी केलेली नाही. सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा इतकी वर्षे तसाच कायम आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.
तरूणांच्या हाताला काम नसताना महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने नेपाळमध्ये उठाव होऊन सत्तांतर झाले. पाठोपाठ फ्रान्समध्येही नेपाळची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढली आहे. या प्रमाणेच भारतात सुद्धा तरूणांच्या मनात संताप आणि आक्रोश दिसून येत आहे. अशा तरूणांना एकत्र करण्याचे काम राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसने आगामी काळात करावे. नोकऱ्या नाही म्हणून तरूणांचे तसेच केळी आणि कापसाला भाव नाही म्हणून संतप्त शेतकऱ्यांचे मोर्चे काढावे, असे आवाहन खडसे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले. सत्तेत राहिल्यानंतर काहीच बोलता येत नाही. मात्र, विरोधात राहून बोलणे सोपे असते. सरकारला आणण्यासाठी बरेच विषय आहेत, असेही खडसे म्हणाले.