जळगाव : जिल्ह्यात करोनाच्या नवीन व्हेरियंटचा शिरकाव झाला असून, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील प्रौढाचा उच्च-रिझोल्यूशन संगणित टोमोग्राफी (एचआरसीटी) अहवाल सकारात्मक आला आहे. रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असून, चिंतेचे कारण नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. करोनाचा नवीन व्हेरियंट देशात पसरत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ठिकठिकाणी उच्च-रिझोल्यूशन संगणित टोमोग्राफी (एचआरसीटी) चाचण्यांना वेग आला आहे. याअनुषंगाने घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे या गावातील ४३ वर्षाची व्यक्ती करोनाबाधित आढळून आली. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वी या रुग्णाची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ७ हजार २०५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले असून, या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व १४ जणांचीही करोना तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. संबंधित रुग्णाची प्रकृती धोक्याबाहेर असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. करोनाचा नवीन व्हेरियंट वेगाने पसरत असला, तरी तो आधीइतका धोकादायक नसल्याची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. राज्यात सर्वाधिक अर्थात २० टक्के करोना तपासण्या जळगाव जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.