मनमाड – येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) साठवणूक व वितरण केंद्रात ठेकेदाराचे कर्मचारी आणि महामंडळाचे कर्मचारी यांच्यातील संघर्ष उफाळून आल्याचा परिणाम धान्य वितरणाचे कामकाज विस्कळीत होण्यात झाला आहे. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. तालुकापातळीवर आणि नंतर स्वस्त धान्य दुकानापर्यंत धान्य पोहोचण्यास विलंब होत आहे.

ठेकेदाराचे कर्मचारी धमकी देतात. त्यामुळे आम्हाला काम करणे अशक्य झाले आहे, अशी तक्रार एफसीआय कर्मचाऱ्यांनी केली. दुसरीकडे, एफसीआयचे कर्मचारी सहकार्य करीत नाहीत, शिवीगाळ आणि मारहाण करतात अशी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. यामुळे गोदामात धान्याच्या पोत्याच्या थप्प्या लावणे, त्याचे वितरण करणे, मालमोटारीत भरणे, या सर्वच कामकाजावर विपरित परिणाम झाला आहे. भारतीय अन्नमहामंडळ कर्मचारी संघटनेने एफसीआय प्रशासनाकडे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून हा प्रकार न थांबल्यास याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत एफसीआय कर्मचारी किसन परदेशी यांनी खासगी ठेकेदाराचे कर्मचारी शिवम गुप्ता यांच्याविरूध्द मनमाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. एफसीआयमध्ये गाडी भरण्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, या साठवणूक केंद्रातून जिल्ह्यातील विविध तहसील गोदामांपर्यंत मालमोटारीद्वारे धान्य वितरण करण्यात येते. तेथून रेशन दुकानदारांना ते वितरित केले जाते. पुढील तीन महिन्यांसाठी जिल्हा प्रशासनाला ६० हजार मेट्रिक टन गहू आणि तांदुळ तातडीने वितरीत होण्याची अपेक्षा आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हे काम रखडल्याचे उघड झाले. आता एकत्रितरित्या तीन महिन्यांचे धान्य वितरित करता येईल किंवा नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.

मनमाड एफसीआयमध्ये निर्माण झालेले प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे निर्देश राज्य शासनाने याआधीच दिले आहेत. परंतु, सोमवारी महिनाअखेर असतानाही बरेच काम अपूर्ण असल्याने कामाचा बोजा वाढला आहे. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावर होत आहे.

मनुष्यबळ कसे ?

सध्या एफसीआयमध्ये २०६ कर्मचाऱ्यांचे अधिकृत मनुष्यबळ आहे. त्यांच्याद्वारे माल भरणे आणि वितरण होते. अधिकारी दर्जाचे ६० जण कार्यरत आहेत. याबरोबरच धान्य वितरण आणि साठवणूक यासाठी समांतर ठेकेदारांची वितरण व्यवस्था असून सध्या ठेकेदाराकडे जवळपास २५० पेक्षा अधिक कर्मचारी असल्याचे समजते. याआधी ठेकेदाराकडे कमी मजूर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तणाव का वाढला ?

३० जूनला पडताळणी होणार असल्याने कर्मचाऱ्यांमधील तणाव वाढला आहे. त्यातूनच कर्मचाऱ्यांना धमकावणे, मारहाण करणे, कामात कसूर, गोदामात कामासाठी लावलेल्या मजुरांना कमी वेतन देणे, नोंदणी न केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणे, अरेरावी, शिवीगाळ, दमदाटी आदी प्रकारांमुळे सध्या एफसीआयमध्ये दररोज वादविवाद व संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येते.