नाशिक : तपोवनातील मैदानावर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होणार असून या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या दिवशी सकाळी १० ते सभा संपेपर्यंत परिसरातील ११ मार्गांवर वाहतूक निर्बंध राहणार आहेत. सभेस येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग आणि वाहनतळांची निश्चिती करण्यात आली आहे. वाहनधारकांनी उपरोक्त मार्गांचा अवलंब करावा, असे वाहतूक पोलीस शाखेने म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ तपोवनातील मैदानात ही सभा होत आहे. सभेसाठी शहर आणि ग्रामीण भागातून नागरिक वाहनाने मोठ्या प्रमाणात दाखल होतील. सभेच्या काळात सभोवतालच्या मार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शुक्रवारी सकाळी १० पासून वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. जवळपास ११ मार्गांवर हे निर्बंध लागू राहणार असल्याचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी म्हटले आहे. वणी, दिंडोरीकडून येणारी वाहने आणि त्या भागातील नागरिक आपली वाहने आरटीओ सिग्नल, दिंडोरी रस्त्याने येऊन रासबिहारी चौफुली येथे आल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्ग ओलांडून निलगिरी बाग, सिद्धीविनायक लॉन्ससमोर उभे करतील. तेथून त्यांना पायी सभास्थळी जाता येईल. मुंबईकडून येणारी वाहने मुंबई नाका- द्वारका चौक- टाकळी फाटा येथून उजवीकडे वळून तिगरानिया कंपनी रस्त्याने ट्रॅक्टर हाऊस समोरून काशी माळी मंगल कार्यालयापासून गोदावरी घाट येथे वाहने उभी करतील. पुणे रस्त्याकडून सभेसाठी येणारी वाहने नाशिकरोड रेल्वे उड्डाण पुलाच्या डाव्या बाजूने खाली उतरून बिटको सिग्नलपासून जेलरोडने दसक, नांदुरनाका सिग्नलजवळ डाव्या बाजूला वळून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने मिर्ची ढाबा सिग्नलमार्गे जेजूरकर मळयासमोरील मोकळ्या जागेत उभी करता येतील.

हेही वाचा :पंतप्रधानांच्या सभेसाठी गर्दी जमविण्याचे नियोजन, तपोवनातील मैदानावर जय्यत तयारी

येवला, लासलगाव, निफाड, विंचूर, चांदोरी, सायखेडा, चेहेडी, ओढा, लाखलगाव, शिलापूर येथून येणारी वाहने ही छत्रपती संभाजी नगर रस्त्याने जनार्दन मठाजवळ इंद्रायणी लॉन्ससमोर उभी करता येतील. धुळे बाजूकडून सभेसाठी येणारी वाहने रासबिहारी शाळा, बळी मंदिराजवळ डावीकडे वळून डाळिंब मार्केट या ठिकाणी उभी केली जातील. तेथून छत्रपती संभाजी नगर रस्त्याने पायी तपोवन नर्सरी रोडने सभेच्या ठिकाणी जाता येईल.

शहरातुन येणारी वाहने ही काट्या मारुती चौकातून टकले नगर-कृष्णानगर-तपोवन क्रॉसिंगमार्गे तसेव संतोष टी पॉईटपासून तपोवन क्रॉसिंगला वळून तपोवन रस्त्याने आणि लक्ष्मी नारायण लॉन्स समोरुन चौफुली ओलांडून कपिला संगमच्या पुढे जातील. तिथे वाहने उभी करून पायी सभेच्या ठिकाणी जाता येईल. बटुक हनुमान मंदिरासमोरील मोकळ्या जागेत दुचाकी उभ्या केल्या जातील. खासदार, आमदार, शासकीय, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाहने साधुग्रामलगतच्या कमानीच्या उजव्या बाजूकडील मोकळ्या जागेत उभी करता येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा :जळगाव जिल्ह्यात बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव, माजी खासदारास अभय

  • मुंबई-आग्रा रस्त्याने धुळे, मालेगाव या भागातून येणाऱ्या लहान वाहनांना उड्डाण पुलावरून मुंबईकडे जाता येईल.
  • मुंबईकडून येणारी लहान वाहने ही धुळ्याकडे जाताना पुलाखालून न जाता द्वारका रॅम्पवरून दोन्हीकडे जातील.
  • मुंबईकडून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारी वाहने व्दारकामार्गे बिटको चौक जेलरोडने नांदुरनाकामार्गे संभाजी नगरकडे जातील.