पुढील प्रवेश प्रक्रिया खोळंबण्याची शक्यता

नाशिक : करोनामुळे अंतिम परीक्षा न झालेल्या इयत्ता १० वीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे नुकताच जाहीर झाला. नाशिक विभागाचा ९९.९६ टक्के निकाल लागला. विभागातील दोन लाख ११५ पैकी दोन लाख ९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नापास होणाऱ्यांची संख्या नगण्य राहिली. उत्तीर्ण झालेल्यांची संख्या अधिक असल्याने इयत्ता ११ वी प्रवेशाचा तिढा निर्माण झाला आहे. शाखानिहाय उपलब्ध जागा तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या पाहता पुढील प्रवेश प्रक्रि या खोळंबण्याची शक्यता आहे.

नाशिक विभागातील निकालात विशेष प्रावीण्य श्रेणी ७८ हजार २१४ जणांना मिळाली. दरवर्षी उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुली आघाडीवर असतात. यावेळी मुलांनी त्यांची बरोबरी गाठली. अंतर्गत मूल्यमापनात अनुत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण कमालीचे घटले. मार्च २०२० मध्ये नाशिक विभागाचा निकाल ९३.७३ टक्के  लागला होता. यंदा त्यात लक्षणीय वाढ झाली. पुनर्परीक्षार्थीना चांगलाच आधार मिळाला. निकालामुळे पालक-विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण असताना शिक्षण विभागापुढे प्रवेश प्रक्रि या कशी पार पाडावी, हे आव्हान आहे.

मागील वर्षी २०२०-२१ मध्ये शाखा निहाय २५,२७० जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रिक्त जागांचे प्रमाण लक्षणीय होते. यंदा मात्र उलट चित्र आहे.

शहर तसेच जिल्हा परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य, किमान कौशल्य अशा शाखानिहाय  २५,२७० जागा उपलब्ध आहेत. तर प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ९२,२१०  इतकी आहे. उपलब्ध जागेच्या तिपटीहून हे प्रमाण अधिक आहे. त्यात पुनर्परीक्षार्थीनाही ११ वीत प्रवेश घेता येत असल्याने संपूर्ण प्रवेश प्रकिया कशी पूर्ण होणार, असा प्रश्न पालक-विद्यार्थी यांना पडला आहे.

राज्य शासनाकडून ११ वी प्रवेश प्रक्रि येसाठी सामाईक प्रवेश परीक्षा ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना  प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जागावाढीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.

याबाबत नऊ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत १५ कनिष्ठ महाविद्यालयांकडून शाखा तसेच तुकडी वाढीचे प्रस्ताव आले आहेत. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतरच उपलब्ध जागा, शाखाप्रवेश यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल.