जळगाव – जिल्ह्यात महायुतीचे घटक पक्ष भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने नवीन सदस्य नोंदणीवर भर देत उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल केली असताना शिवसेनेला (एकनाथ शिंदे) दीड लाखांचे उद्दिष्ट पूर्ण करताना नाकीनऊ आले आहेत. तीन महिन्यात जेमतेम ४० टक्केच नोंदणी झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदस्य नोंदणीत कमी पडलेल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर आणि ग्रामीण मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा शनिवारी झाला. मेळाव्यात मार्गदर्शन करताना पक्षाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नवीन सदस्य नोंदणीचा आढावा घेतला. सदस्य नोंदणीत पिछाडीवर पडलेल्या जळगाव शहरासह ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून कोणत्याही परिस्थितीत कामगिरीत सुधारणा करण्याचे आदेश दिले.
जळगाव जिल्ह्यास पक्षाकडून सुमारे दीड लाख नवीन सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रत्यक्षात, तीन महिन्यात जळगाव शहरातून १० हजार, जळगाव ग्रामीणमधून १७ हजार आणि शिंदे गटाचे आमदार असलेल्या पाचोरा, चोपडा, एरंडोल-पारोळा आणि मुक्ताईनगर या मतदारसंघातून २५ हजारावर नवीन सदस्य नोंदविण्यात आले आहेत. अल्प नोंदणीमुळे चिंता व्यक्त करून दीड लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेषतः जळगाव शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरकस प्रयत्न करण्याची सूचना पालकमंत्री पाटील यांनी केली.
प्रसंगी मतदारसंघनिहाय संपर्क मोहीम राबविण्यासह गट, गणनिहाय नियोजन करण्याचे, बूथ समिती, महिला आघाडी व युवासेना यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपविण्याचे, किमान एक लाख नवीन सदस्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. याशिवाय, शिवसेना ही केवळ निवडणूक जिंकण्याची यंत्रणा नाही, तर ती बाळासाहेब ठाकरे यांची लोक चळवळ आहे.
पदाधिकाऱ्यांनी सामाजिक कार्याला श्वास मानून समाजात काम करावे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख नरेंद्र सपकाळे, युवा सेनेचे विस्तारक किशोर भोसले, उपजिल्हा प्रमुख रवींद्र कापडणे, जळगाव महानगर प्रमुख संतोष पाटील, शहरप्रमुख गणेश सोनवणे, जळगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख अजय महाजन आदी उपस्थित होते.