मालेगाव : राज्यात शिक्षक भरतीच्या शालार्थ प्रणालीतील घोटाळ्याचे दररोज एकेक प्रकरण उजेडात येत असताना शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील एका शाळेत मागील तारखेपासून शिक्षकांची नियुक्ती दाखवित गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणात सात शिक्षकांच्या वेतनापोटी सुमारे अडीच कोटी रुपये लुबाडण्यात आल्याचा संशय आहे. या प्रकरणी संस्थाचालक, मुख्याध्यापिका, लिपीक यांसह सहा जणांविरोधात येथील आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते जाबीर शाह यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. सिटीजन वेल्फेअर एज्युकेशन या अल्पसंख्यांक दर्जा असलेल्या संस्थेच्या सरदार प्राथमिक शाळेतील वाढीव तुकड्यांचा महापालिका शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकाऱ्यांकडून कोणताही अधिकृत प्रस्ताव सादर केला गेला नसतांना बनावट प्रस्ताव तयार केला गेला. तसेच शिक्षण उपसंचालकांकडून २००५-०६ पासून ३१ वाढीव तुकड्यांना विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता असल्यासंबधीचे बनावट आदेश २०१२ मध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर या तुकड्यांवर कार्यरत असलेल्या विनाअनुदानित तत्त्वावरील सात शिक्षकांची २०२० पासून अनुदानित जागांवर वर्णी लावल्याचे दर्शविण्यात आले. यात शासनाकडून शिक्षकांना वेतन आणि फरक म्हणून देण्यात आलेल्या सुमारे अडीच कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तक्रारीनुसार संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंजूर अय्युबी, उपाध्यक्ष डॉ.अब्दुल हमीद, सचिव डॉ. आसिफ सलीम, सदस्य डॉ. अय्युबी हसन, मुख्याध्यापिका अय्युबी परवीन आणि तौसिफ अहमद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.