नाशिक – शहरातील गुन्हेगारीचा उंचावणारा आलेख, अमली पदार्थांची विक्री, महिलांवरील अत्याचार, छेडछाडीचे प्रकार, हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी, शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आणि महानगरपालिकेत सत्तेसाठी प्रभाग रचनेत महायुतीकडून मनमानीपणे फेरफार झाल्याची तक्रार करीत याकडे लक्ष वेधण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी मनसे आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांकडून एकत्रितपणे काढण्यात येणारा हा पहिलाच मोर्चा ठरणार आहे.

याबाबतची माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. मोर्चाच्या तयारीसाठी अलीकडेच पहिली बैठक ठाकरे गटाच्या कार्यालयात झाली होती. त्यानंतर मनसे- ठाकरे गटाची दुसरी बैठक मनसेच्या राजगड कार्यालयात पार पडली. यावेळी मनसेचे प्रदेशाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, ठाकरे गटाचे महानगरप्रमुख प्रथमेश गिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, खड्डेमय रस्ते, पावसाळ्यात काही भागात पाणी टंचाईची स्थिती अशा अनेक प्रश्नांनी नागरिक त्रस्त आहेत. शहरात खून, महिला छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. अमली पदार्थांचे शाळा, महाविद्यालय परिसरात जाळे आहे. तरुणाई ऑनलाईन गेमच्या आहारी गेली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. महिनाभर हनी ट्रॅप प्रकरण गाजत होते. त्याची चौकशी करण्याची गरज मांडली गेली.

महापालिकेच्या प्रभागरचना आखणीत सत्ताधाऱ्यांनी सत्तेसाठी फेरफार केल्याचा आरोप करुन त्याची पडताळणी करण्याची मागणी मोर्चाद्वारे केली जाणार आहे. निधी असूनही शहराची बकाल अवस्था झाली आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात अभाव आहे. स्मार्ट सिटी कंपनीचे प्रकल्प ठप्प झाले. जिल्हा रुग्णालयात रुग्णांना औषधे, खाटा, तपासणीची सुविधा मिळत नाही. बनावट बियाणे, रासायनिक खतांच्या अपुरा पुरवठ्याचा शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. कांद्याला हमीभाव नाही. बनावट पुरवठादारांवर कारवाई करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

पूर्वतयारीसाठी विभागनिहाय २२ बैठका

मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी १४ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत विभागनिहाय मनसे-ठाकरे गटाच्या एकूण २२ संयुक्त बैठका होणार आहेत. यातील १४ ते २० ऑगस्ट या कालावधीत शहरात तर त्यापुढील बैठका ग्रामीण भागात तालुकानिहाय होणार आहेत. यानिमित्ताने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकत्रित आणले जाईल.

प्रभाग रचनेत फेरफार

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना नियमानुसार करण्यात आलेली नाही. सत्तेसाठी महायुतीने त्यात फेरफार केल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केला. प्रारुप प्रभाग रचनेत लोकसंख्येच्या प्रमाणात विसंगती आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी आणि काही प्रभाग रचनांचे पुनर्निरीक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली.