MPSC Exam 2025 Controversy / मालेगाव : राज्यात ठिकठिकाणी झालेली अतिवृष्टी व नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हे संकट लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीने जोर धरला आहे.
आताच्या घडीला ही परीक्षा घेण्यावर एमपीएससी ठाम असल्याचे दिसत असले तरी परीक्षार्थींची अडचण लक्षात घेता राज्य शासन यात अजुनही हस्तक्षेप करु शकते,अशी एक शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसऱ्या बाजूला याविषयी मौन पाळत असल्याचा ठपका ठेवत विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांना ‘लक्ष्य’ करण्याचा देखील प्रयत्न होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांवर येऊन ठेपलेली ही परीक्षा पुढे ढकलली जाते की काय, याबद्दल उमेदवारांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचे चित्र आहे.
गेली काही दिवस मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र,अशा राज्यभरातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी तसेच गंभीर पूरस्थितीमुळे हाहाःकार उडाला आहे. त्यामुळे २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी उमेदवार व विविध राजकीय नेत्यांनी लावून धरली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही परीक्षा नियोजित वेळेवरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा घेण्यासाठी कोणतीही अडचण नाही,असा दावा आयोगाकडून करण्यात येत आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून परीक्षा वेळेवर होणार असल्याने उमेदवारांनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचावे, असे आवाहन देखील आयोगाकडून करण्यात आले आहे. राज्याच्या ३६ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. एमपीएससीने अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आहे.
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अभ्यासावर परिणाम झाल्याने एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नुकसान झाले आहे. काही ठिकाणी स्थानिक वाचनालये बंद झाल्याने मोक्याच्या वेळी विद्यार्थ्यांना अभ्यास करणे शक्य झाले नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचे अभ्यास साहित्य पाण्यात भिजले आहे. वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाल्याने परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचणे अवघड होईल, अशी भीती विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या कारणांमुळे राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी अनेक परीक्षार्थी व विविध पक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.
अतिवृष्टीचे संकट लक्षात घेता राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे २५ व २६ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पुढील काही दिवस हवामान विभागाने राज्यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अशी परिस्थिती असताना एमपीएससी परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे दिसते तर राज्य शासनाने यासंदर्भात अद्याप आपली भूमिका जाहीर केली नसल्याची स्थिती आहे. त्यावरून शासनाला विद्यार्थी हिताकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे म्हणत विरोधकांकडून आता सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणे सुरू झाले आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या कारणारुन राज्य शासन एमपीएससीला परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती वा शिफारस करू शकत असताना शासन मूग गिळून का बसले आहे, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.