मालेगाव : शेतकऱ्यांविषयी अवमानजनक वक्तव्य करणारे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या निषेधार्थ शुक्रवारी महाविकास आघाडीच्या वतीने येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी केली. लोणीकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

आमदार लोणीकर यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांविषयी ‘तुझ्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनी दिले. तसेच तुझ्या अंगावरचे कपडे, तुझ्या पायातील बूट व मोबाईलही मोदींनीच दिला ‘ असे वक्तव्य केले होते. त्यावर अशा प्रकारे मग्रुरीची भाषा वापरणारे लोणीकर आणि त्यांच्या पक्षाची मानसिकता कोणत्या दर्जाची आहे, हे लक्षात येते, अशी टीका आंदोलकांनी केली.

शेतकऱ्यांविषयी निंदाजनक वक्तव्य करणारे लोणीकर हे महाराष्ट्रातील जनतेला लाचार समजत आहेत, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. आपल्याला मिळालेली आमदारकी, गाडी, गाडीतील डिझेल, त्यांच्यावर होणारा खर्च हे सर्वसामान्य जनतेच्या पैशांतूनच होत आहे. हे शेतकऱ्यांवर उपकार केल्याची भाषा बोलणाऱ्या लोणीकर यांनी आधी लक्षात घ्यावे, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, महिला तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात भाजपची मंडळी सतत काही ना काही आपत्तीजनक वक्तव्य करून तेढ निर्माण करण्याचे उद्योग करीत असते, असे नमूद करत लोणीकरांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा अपमान झाल्याने सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांचा राजीनामा घ्यावा, असा आग्रह आंदोलकांनी धरला. महाविकास आघाडीच्या वतीने या संदर्भात अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन देण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंदोलनात राष्ट्रवादीचे (शरद पवार) तालुका अध्यक्ष संदीप पवार, शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) महानगर प्रमुख जितेंद्र देसले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद खैरनार, ज्येष्ठ नेते अरुण देवरे, सलीम रिजवी, दिनेश ठाकरे आदी सहभागी झाले होते.