मालेगाव – येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या खंदकाची संरक्षण भिंत पाडण्याच्या घटनेला एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर येथील किल्ला पोलीस ठाण्यात समाजकंटकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराबद्दल पोलीस व पुरातत्त्व विभागाने एकमेकांकडे बोट दाखवत गुन्हा दाखल करण्यात कमालीची चालढकल केल्याचा आरोप भुईकोट किल्ला बचाव समितीने केला आहे.

गेल्या २८ मेच्या रात्री किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील खंदकाच्या उजव्या बाजूकडील संरक्षण भिंतीचा काही भाग अज्ञात समाजकंटकांकडून पाडून टाकण्याचा प्रकार घडला आहे. किल्ल्याच्या शेजारीच महापालिकेची इमारत आहे. या संरक्षण भिंतीलगत दिवसभर वाहने उभी करून ठेवली जात असल्याने ही बाब सर्वसामान्य नागरिकांच्या निदर्शनास येऊ शकली नव्हती. सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांना शुक्रवारी या संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर भुईकोट किल्ला बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते घटनास्थळी पोहोचले.

हा किल्ला ज्यांच्या अधिपत्याखाली आहे, त्या पुरातत्त्व विभागाने किल्ल्याच्या देखरेखीसाठी तेथे सचिन कुलकर्णी या कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. या संदर्भात विचारणा केल्यावर महिन्याभरापूर्वीच भिंतीचा भाग पाडण्याचा प्रकार निदर्शनास आला होता, अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली. या संदर्भात आपण पोलिसात तक्रार देण्यासाठी गेलो होतो, परंतु प्रतिसाद मिळाला नाही, असा सूर देखील त्यांनी लावला.

पोलीस व पुरातत्त्व विभागाकडून या गंभीर प्रकाराबद्दल बेपर्वाई दाखविल्याची बाब निदर्शनास आल्याने बोरसे व त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते संतप्त झाले. कुलकर्णी यांना सोबत घेऊन त्यांनी किल्ला पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर कुलकर्णी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भुईकोट किल्ल्यावरील किल्ला झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ३५० घरांची अतिक्रमणे गेल्या ३० मे पूर्वी काढण्याचे राज्य शासनाने आदेश दिले होते. परंतु उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे प्रशासनाला ही कारवाई प्रलंबित ठेवावी लागली आहे. अतिक्रमणे हटविण्याच्या कारवाईसाठी जी मुदत घालून दिली होती, नेमकी तीच वेळ साधत समाजकंटकांकडून किल्ल्याची संरक्षण भिंत पाडण्याचा प्रमाद घडणे व पोलीस व पुरातत्त्व विभागाकडून त्याकडे इतके दिवस दुर्लक्ष होणे,याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.