नाशिक – शहरात अवघ्या १५ तासांत ४७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्रभर संततधार सुरू राहिली. सखल भागातील रस्ते आणि चौकात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. पावसाने रस्त्यांची पुरती वाट लागली असून या एकंदर परिस्थितीत रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक ठरली आहे. अंबड औद्योगिक वसाहतीत मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची बिकट अवस्था आहे. पावसामुळे धरणांमधील विसर्गात वाढ झाली आहे. गंगापूरमधून पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी दुथडी भरून वहात आहे.

आदल्या दिवशी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाने रात्रभर हजेरी लावली. १५ तासांत ४७.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. पाऊस थांबला तरी अनेक रस्ते व चौकात पाणी साचून राहते. त्याचा निचरा होत नाही. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सर्वेक्षणात २१० पाणी साचण्याची ठिकाणे समोर आली होती. त्यावर उपाययोजना केल्याचे सांगितले गेले.

तथापि, प्रत्यक्षात परिस्थितीत कुठलीच सुधारणा झाली नसल्याचे दिसून येते. पावसाने रस्त्यांची चाळणी झाली. मोठे खड्डे पडले आहेत. खड्डेमय रस्ते, अनेक चौकात, रस्त्यांवर साचलेले पाणी यातून मार्गक्रमण करणे दुचाकी वाहनधारक व सायकलस्वारांसाठी धोकादायक ठरते. यामुळेे अपघात घडत असून मनपाच्या कार्यशैलीवर जनतेमधून रोष प्रगट होत आहे.

ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पावसाने उघडीप घेतली की, महापालिका खड्डे बुजवण्याचे काम हाती घेते. मात्र, त्यांची स्थिती पुन्हा पूर्वीसारखी बनते. बुजवलेले खड्डे पुन्हा उघडे पडतात. मागील तीन, चार महिन्यांपासून हा खेळ सुरू असून या कामावर केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे.

ग्रामीण भागात पाऊस कोसळत असल्याने धरणांमधून विसर्ग वाढविला जात आहे. जिल्ह्यातील १७ धरणांमधून विसर्ग करण्यात आला. गंगापूरच्या विसर्गात ६३५६ क्युसेकपर्यंत वाढ झाल्यामुळे गोदावरी दुथडी भरून वहात आहे. दारणा धरणातून २२०४, वालदेवी १०७, आळंदी २४३, भावली २९०, भाम ७६७, वाघाड ८८९, पालखेड ५१९६, नांदूरमध्येश्वर १५७७५, करंजवण ५८८५, कडवा ८४०, तिसगाव १६७, गौतमी गोदावरी ७२०, कश्यपी ५६०, मुकणे ३६३, पुणेगाव १९०० आणि ओझरखेड धरणांमधून २९८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.

पेठ, चांदवड तालुक्यात नुकसान

पेठ तालुक्यातील डोंगराळ आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. पेठ तालुक्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. चांदवड तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.