न्यायालयाच्या आवारात संशयितांना पाण्याच्या बाटलीतून मद्य देण्याचा प्रयत्न करताना हटकणाऱ्या पोलिसाला धक्काबुक्की करत धमकावल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे रिपाइं जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश लोंढेला अखेरीस पोलिसात शरण जाणे भाग पडले. गुन्हा दाखल झाल्यापासून २० दिवस लोंढे फरार होता. या काळात पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथके स्थापन केल्याचे सांगितले गेले. परंतु, इतके दिवस पोलिसांना न सापडलेला लोंढे स्वत:हून सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला. न्यायालयाच्या आवारात दुहेरी खून प्रकरणातील संशयितांना मद्य देण्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच दुहेरी प्रकरणात त्याचा मुलगा पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे पाच महिन्यांपासून फरार आहे. तात्पुरता जामीन घेत बोहल्यावर चढून तो अंतर्धान पावला. आजतागायत त्याचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. पोलीस कर्मचाऱ्याला धमकावल्याच्या प्रकरणात नगरसेवक लोंढे शरण आला. परंतु दुहेरी खून प्रकरणातील भूषणच्या मुसक्या पोलीस कधी आवळणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

दुहेरी खून प्रकरणातील संशयितांना २४ मे रोजी न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी नगरसेवक लोंढेने पाण्याच्या बाटलीतून मद्य तसेच आंब्याची पिशवी देण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलिसांनी विरोध केल्यावर लोंढेने ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी प्रथम जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. परंतु, जिल्हा न्यायालय आणि पाठोपाठ उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने लोंढेच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला होता. या घडामोडी लक्षात घेऊन बुधवारी सकाळी पाच ते सहा कार्यकर्त्यांसमवेत खुद्द नगरसेवक लोंढे सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला. यावेळी पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. कर्मचाऱ्यांनी त्याचे स्वागत उभे राहून केले. एकवेळ तर अशी होती की, ‘लोंढे खुर्चीवर स्थानापन्न आणि कर्मचारी उभे’ ही बाब बरेच काही सांगणारी.

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणात नगरसेवकाला शरण यावे लागले असले तरी दुहेरी खून प्रकरणात तात्पुरता जामीन घेऊन फरार असलेल्या भूषण लोंढेला पोलीस चार ते पाच महिन्यात जेरबंद करू शकलेले नाहीत. ३१ डिसेंबरच्या रात्री सातपूर पोलीस ठाण्यालगत जगताप वाडीत पीएल ग्रुपच्या कार्यालयात दोन सराईत गुन्हेगारांची हत्या झाली होती. संबंधितांचे मृतदेह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जव्हार फाटा येथे फेकण्यात आले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यावेळी भूषण लोंढेने लग्नासाठी उच्च न्यायालयाकडून तात्पुरत्या स्वरूपात जामीन मिळवला.

लग्नाच्या बोहल्यावर चढल्यानंतर तो जो गायब झाला तो आजतागायत पोलिसांना सापडलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पोलीस गुन्हेगारांविरोधात शोध मोहीम राबवत आहे. परंतु, राजाश्रय लाभलेले सराईत गुन्हेगार मात्र पोलिसांना काही केल्या सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.