नाशिक – शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी गंगापूर धरण पंपिंग केंद्र ते १२ बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जल वाहिनीचे काम सुरू आहे. १७५ कोटी रुपयांच्या या कामात अनियमितता झाल्याची तक्रार झाल्यानंतर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विभागीय आयुक्तांमार्फत याबाबत चौकशी करण्यात येईल, असे लक्षवेधीला उत्तर देताना म्हटले आहे.

नाशिक पूर्वचे ॲड. राहुल ढिकले यांनी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. नाशिक शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महानगरपालिका थेट गंगापूर धरणातून पाणी उचलून ते जल वाहिनीद्वारे शहरातील जलशुध्दीकरण केंद्रात आणते. ही जलवाहिनी जुनी झाल्यामुळे वारंवार गळती होऊन शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होतो. यामुळे महापालिकेने अधिक क्षमतेची नवीन थेट जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. पावणेदोनशे कोटी रुपयांच्या या कामात ठेकेदाराला ७५ कोटी रुपये आगावू देण्यात आल्याचे सांगितले जाते.

या योजनेत च्या सहा मीटरचा पाईप वापरणे निश्चित असताना १२ मीटरचा पाईप वापरला गेला. याबद्दल मनपा प्रशासनाला विचारात घेण्यात आले नाही. अटी-शर्तीत परस्पर बदल करताना तसेच घडले. थेट पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी २०० किलोमीटर परिघातून सिमेंट पाईप घेण्याचे बंधनकारक होते. परंतु, या अटींचे उल्लंघन झाल्याचा आक्षेप घेतला गेला.

माधुरी मिसाळ यांचे उत्तर

या योजनेच्या कामात कोणत्याही निविदा अटींचे उल्लंघन झाले नसल्याचे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले. मान्यताप्राप्त उत्पादन कंपनीकडूनच भारतीय मानकानुसार गुणवत्तापूर्ण पाईप खरेदी करण्यात आले आहे. हे काम सिंहस्थापूर्वी म्हणजेच २०२७- २८ पूर्वी होणे गरजेचे आहे. २०२५ – २६ आर्थिक वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल. या कामात अनियमितता झाली असल्यास त्याची चौकशी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

क्षमता कशी विस्तारणार ?

नाशिक शहरातील पाणी पुरवठ्यासाठी ७५ टक्के पाणी गंगापूर तर २५ टक्के पाणी मुकणे धरणातून घेण्यात येते. सद्यस्थितीत एकूण ५५५ दशलक्ष लिटर पाणी धरणातून घेतले जाते. यातील गंगापूर धरणातून अस्तित्वातील वाहिन्यांची क्षमता सुमारे ३०० दशलक्ष लिटर आहे. हे सर्व पाणी शहरातील सात केंद्रात शुद्धीकरण करून ११९ जलकुंभ आणि सुमारे अडीच हजार किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांमधून वितरित केले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गंगापूर धरण ते बारा बंगला ही नवीन जलवाहिनी जुन्या वाहिनीला समांतर असणार आहे. नवीन जलवाहिनीची क्षमता २२ तासात ४२५ दशलक्ष लिटर पाणी वहनाची आहे. ती २४ तास कार्यरत राहिल्यास ही क्षमता ४६० दशलक्ष लिटरपर्यंत जाऊ शकते. शहराची २०५५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून जलवाहिनीचे नियोजन झाल्याचे अधिकारी सांगतात.